निस्सान मोटर इंडिया जागतिक निर्यातीसाठी सज्ज
वृत्तसंस्था/ मुंबई
जपानमधील ऑटो निर्माती कंपनी निस्सान भारतामधून इतर देशांमध्ये कारच्या निर्यातीसाठी नेटाने प्रयत्न करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 65 हून अधिक देशांना भारतातून विविध कार्सची निर्यात करण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.
जागतिक वाहन निर्यातीसाठी भारत हे प्रमुख केंद्र होत असून यामध्ये आता निस्सान या कंपनीचा वाटासुद्धा महत्त्वाचा राहणार आहे. कंपनीने एसयूव्ही गटातील मॅग्नाईटचे उत्पादन भारतात केले असून त्याची निर्यात जवळपास 65 देशांना करण्याची तयारी सुरु केली आहे. 10 हजारपेक्षा अधिक वाहनांची निर्यात लवकरच केली जाणार असून येणाऱ्या काळामध्ये हायब्रीड आणि सीएनजी या इंधनावर आधारित अधिक मॉडेल्स भारतामध्ये लाँच करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
निस्सान आणि होंडा यांच्यामध्ये भागीदारीसाठी प्रयत्न सुरु असून याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी लवकरच नव्या उत्पादनांना बाजारात उतरविणार असून त्यामध्ये दोन मध्यम आकाराच्या एसयूव्ही कारचा समावेश असणार आहे. तसेच एक एसयूव्ही ही इलेक्ट्रिक प्रकारातील असल्याचे म्हटले जात आहे.
निर्यातीत उडी
65 पेक्षा अधिक देशांना कंपनीची मॅग्नाईट ही कार निर्यात केली जाणार आहे. निस्सान मोटर इंडिया यापूर्वी 20 देशांना सदरची गाडी निर्यात करत होती. आता आणखी 45 देशांची यामध्ये भर घातली आहे. मध्य आशिया, उत्तर आफ्रिका आणि आशिया पॅसिफीक विभागांना 2000 गाड्यांची निर्यात केली जाणार असून लॅटीन अमेरिका विभागात 5100 गाड्यांची निर्यात केली जाणार आहे. एकंदर 10 हजार गाड्यांची निर्यात केली जाणार आहे.