मनालीची निशा ठाकूर ‘विंटर क्वीन-2024’
कोहिनूर सरकेक फर्स्ट रनर अप, भव्या सेकंड रनर अप
वृत्तसंस्था/ कुल्लू
मनाली विंटर कार्निव्हलमध्ये निशा ठाकूरला ‘विंटर क्वीन-2024’चा मुकूट घालण्यात आला. कोहिनूर सरकेक फर्स्ट रनर अप ठरली असून भव्या पंडित सेकंड रनर अप ठरली. मनालीतील मनू रंगशाळेत मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 15 सौंदर्यवतींनी उणे तापमानात अनेक लक्षवेधी रॅम्पवॉक सादर करत सौंदर्यस्पर्धेची रंगत वाढवली. या स्पर्धेत लक्ष्मी नामक युवतीने ‘व्हॉईस ऑफ विंटर कार्निव्हल 2024’चे विजेतेपद पटकावले. तर कुणाल सूद पहिला उपविजेता आणि हरीश ठाकूर दुसरा उपविजेता ठरला.
कुल्लू-मनाली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हिवाळी कार्निव्हलमध्ये निशा ठाकूरची विजेती म्हणून निवड झाली. ती मनाली येथीलच रहिवासी आहे. या स्पर्धेत तिने अंतिम फेरीत 15 स्पर्धकांना पराभूत करत विजेतेपद पटकावले. शिमला येथील कोहिनूर सरकेक आणि मनालीची भव्या पंडित ह्या उपविजेत्या ठरल्या. पहिल्या फेरीत सौदर्यवतींनी रॅम्पवर पॅटवॉक केला. दुसऱ्या फेरीत जजेसनी विचारलेल्या प्रश्नांना बहुतांश सौंदर्यवतींनी पूर्ण आत्मविश्वासाने उत्तरे दिली. यानंतर अंतिम फेरी झाली.
यंदा प्रथमच, सर्व सहभागींना दुसऱ्या फेरीत संधी देण्यात आली. प्रथम विजेत्याला एक लाख ऊपये आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. प्रथम उपविजेत्याला 50,000 ऊपये आणि द्वितीय उपविजेत्याला 30,000 ऊपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. मनालीचे आमदार भुवनेश्वर गौर यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले.