निरुखे - सुतारवाडीत बेकायदा बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर छापा
३ बंदुकांसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त ; एक संशयित ताब्यात ; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील निरुखे - सुतारवाडी येथे गोपनीय पद्धतीने बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३ तयार बंदुका, ६ बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री ( ६५, रा. निरुखे - सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या घटनेने निरुखे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे .जिल्ह्यात 'ऑल आऊट ऑपरेशन' अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला कुडाळ तालुक्यातील निरुखे - सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध अग्निशस्त्रे तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निरुखे - सुतारावाडी येथे छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ३ तयार अग्निशस्त्रे, बंदुकीचे ४ लाकडी बट, ६ लोखंडी बॅरल आणि शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी संशयित जगन्नाथ मेस्त्री याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सुधीर सावंत, हवालदार सदानंद राणे, डॉमिनिक डिसोजा, प्रकाश कदम, राजेंद्र गोसावी, रूपाली खानोलकर, विल्सन डिसोजा, आशिष जामदार, जॅक्सन घोंसाळविस व महेश्वर समजिस्कर यांच्या पथकाने केली.या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रे बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, मेस्त्री याने अजून कुणा - कुणाला बंदुका विकल्या आहेत का ? याचा तपास पोलीस करीत आहेत. या कारखान्यातून बऱ्याच बंदूका यापूर्वी विक्री झाल्याची चर्चा आता परीसरात सुरु झाली आहे.