निर्माण चौक रहदारीसाठी धोकादायक
कोल्हापूर :
संभाजीनगर ते एसएससी बोर्ड मार्गावरील निर्माण चौकात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. येथून चार बाजूंनी वाहतूक होते. यामुळे या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लालवण्यासाठी वाहतूक पोलिसांची गरज आहे. वाहतूक पोलिसाचा अभाव आणि बेशिस्त वाहनधारक यामुळे लहान मोठे अपघात होत आहे. याकडे महापालिका आणि वाहतूक शाखेने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.
निर्माण चौकातून संभाजीनगरकडून एसएससी बोर्ड, हॉकी स्टेडियम, रेसकोर्स नाक्याकडून मधल्या रस्त्याने निर्माण चौकातून पुढे मैलखड्डा आणि पुढे रामानंदनगर अशी वाहतूक होते. हा मार्ग आता नेहमीच वर्दळीचा झाला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत निर्माण चौकातून हजारो वाहने ये- जा करतात. पण पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी उपाययोजना नसल्याचे नागरिकांतून सांगण्यात येते. चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पटे असायला हवेत पण ते नाहीत. स्टॉप लाईट नाही. यामुळे रस्ता ओलांडत असताना पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रहदारी करावी लागत आहे. परिणामी अनेक वेळा लहान मोठे अपघात होत आहेत. यापूर्वी या चौकात एसटीच्या अपघातामध्ये एका महिलेला प्राण गमवावे लागले आहेत. येथील समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.
- रेसकोर्स नाका ते निर्माण चौक हा मधला रस्ता एकेरी करण्याची गरज
रेसकोर्स नाक्यावरुन निर्माण चौक, तसेच इंदिरासागर हॉटेलसमोरील सिग्नलमार्गे मैलखड्ड्याकडे जाता येते. यामुळे रेसकोर्स नाका ते निर्माण चौक हा रस्ता एकेरी केल्यास वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. यासाठी हा मार्ग एकेरी करण्याची मागणी येथील नागरिकांतून होत आहे.
- प्रशासनाला कळवूनही कारवाई नाही
निर्माण चौकातील वाहतुकीच्या समस्येबद्दल महापालिका आणि पोलीस प्रशासनाला कळवून माहिती दिली आहे. याठिकाणी सीसीटीव्ही नाही. वाहतूकीची कोंडी होत असल्याने ती सोडवून शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची गरज आहे. पण या दोन्ही बाबींचा अभाव आहे. प्रशासनाने याठिकाणी सुविधा उपलब्ध कराव्यात आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.
अॅड प्रमोद दाभाडे- स्थानिक रहिवासी
- खासगी बसमुळे अडथळा
निर्माण चौक ते संभाजीनगर सिग्नल या रस्त्यावर दक्षिणेला काही खासगी आराम बस थांबतात. येथेच त्या बसेस धुतल्या जातात. यामुळे मागील वाहने तिथून ओव्हर टेक करत असताना अडचणी येत आहेत. वाहतूक शाखेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
- चौकात सतत पाणीगळती
निर्माण चौकात सतत पाणीगळती होत आहे. यामुळे येथील रस्ता खराब होऊन खड्डे पडत आहेत. आताही गळती असून खड्ड्यामुळे अपघात होत आहेत. महापालिकेने ही गळती थांबवण्याची मागणी होत आहे.