निरज चोप्राचे झिलीझेनी नवे प्रशिक्षक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा भालाफेकधारक अॅथलिट तसेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविणारा निरज चोप्राला आता 2025 च्या अॅथलेटिक हंगामासाठी झेकचे प्रख्यात भालाफेकधारक आणि प्रशिक्षक जेन झिलीझेनी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आता झिलीझेनी हे निरज चोप्राचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील.
निरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविण्याचा विक्रम केला. पण 2024 साली झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत निरज चोप्राचे सुवर्णपदक हुकले. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या निरज चोप्राने आपल्या अॅथलेटिक क्षेत्रातील नव्या अध्यायाला प्रारंभ होणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. निरज चोप्रा हा 58 वर्षीय झिलीझेनी यांचा चाहता आहे. 2019 सालापासून निरज चोप्राला जर्मनीचे बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लॉस बार्टोनिझ यांचे मार्गदर्शन लाभत होते. आतापर्यंत भालाफेक या क्रीडा प्रकारात निरज चोप्राला 90 मीटरचा पल्ला ओलांडता आलेला नाही. त्यामुळे पुढील वर्षीच्या अॅथलेटिक हंगामात हे उद्दिष्ट साद्य करण्यासाठी निरजला योग्य तांत्रिक मार्गदर्शनाची जरुरी असल्याने आता झिलीझेनी त्याला हे ध्येय गाठण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. झेकच्या झिलीझेनी यांनी आपल्या अॅथलेटिक कारकिर्दीत 1992, 1996 आणि 2000 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळविले आहे. झिलीझेनी यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या व्हॅडेलेच तसेच कास्यपदक विजेत्या व्हेसेली त्याच प्रमाणे दोनवेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि तीनवेळा विश्वचॅम्पियन ठरणाऱ्या बार्बोरा स्पोटाकोव्हाला मार्गदर्शन केले होते.