वंटमुरीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत निपाणीचा युवक ठार
प्रतिनिधी/ बेळगाव
अज्ञात वाहनाने मोटारसायकलला ठोकरल्याने निपाणी येथील युवक जागीच ठार झाला. शनिवारी दुपारी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वंटमुरीजवळ ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. बालेचंद नजीर मुल्ला, राहणार भीमनगर, विद्यामंदिरजवळ निपाणी असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. केए 23 एचजी 8808 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून निपाणीहून बेळगावकडे येताना ही घटना घडली आहे. बालेचंद यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे.
बेळगावला जाण्याचे सांगून शनिवारी सकाळी बालेचंद निपाणीतून बाहेर पडले होते. त्यांच्या मुलाला मित्राचा फोन आला. वंटमुरीजवळ तुमच्या वडिलांच्या मोटारसायकलला अपघात झाला आहे, अशी माहिती दिल्यानंतर मुलगा व इतर कुटुंबीय बेळगावात दाखल झाले. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
बालेचंद हे व्यवसायाने ऑटोरिक्षा मेकॅनिक होते. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने आपल्या वाहनासह पलायन केले आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. निपाणी येथील युवकाचा बळी घेणाऱ्या अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू आहे.