धामणीतील नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
सांगली :
इनाम धामणी (ता. मिरज) येथील नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली असून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इनाम धामणीतील मृत विद्यार्थी हा शहरातील एका शिक्षण संस्थेत नववीत शिकत होता. त्याने राहत्या घरातील हॉलमध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. कुटुंबियांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडिल, भाऊ असा परिवार आहे. नववीतील विद्यार्थ्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, याचा पोलिस शोध घेत आहेत. पण, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभ्यासावरून ही घटना घडल्याची दबक्या आवाजाने चर्चा होती. त्या शाळेतील मित्र व शिक्षकांकडे पोलिस चौकशी करणार आहेत. पोलिस निरीक्षक किरण चौगले अधिक तपास करत आहेत.