निमिषा प्रिया फाशीला मान्यता नाही
येमेनची भारतीय दुतावासाला माहिती : शिक्षा टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वंशाच्या परिचारिका निमिषा प्रिया यांच्या फाशीला येमेनच्या अध्यक्षांनी मान्यता दिलेली नाही, असे स्पष्टीकरण त्या देशाने केले आहे. प्रिया यांच्यावर त्यांच्या येमेनी पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांना येमेनमधील कनिष्ठ न्यायालयाने या आरोपात फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यांची फाशी टळावी म्हणून भारत सरकार आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करीत आहेत.
प्रिया यांच्या फाशीला येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही मान्यता दिल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे अध्यक्षांनी जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर एका महिन्यात केव्हाही त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे भारत सरकारने येमेनमधील आपल्या दूतावासाच्या माध्यमातून अध्यक्षांच्या कार्यालयाशी संपर्क केला होता.
हुती बंडखोरांकडून कारवाई
निमिषा प्रिया यांच्याविरोधात येमेनच्या अधिकृत सरकारने कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही. जी कारवाई त्यांच्या विरोधात झालेली आहे, ती या देशातील हुती बंडखोरांनी केली आहे. येमेनच्या काही भागावर सध्या हुती बंडखोरांचा अवैध ताबा आहे आणि ते आपल्या पद्धतीने कारवाई करतात, असे स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. मात्र, हुती बंडखोरांनी केलेली कारवाई कायदेशीर तसेच अधिकृत नसल्याने देशाच्या अधिकृत अध्यक्षांनी या कारवाईला मान्यता देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे अध्यक्षांच्या कार्यालयाचे म्हणणे आहे.
पुढे काय होणार?
निमिषा प्रिया या सध्या येमेन सरकारच्या ताब्यात आहेत, की हुती बंडखोरांच्या, असा प्रश्न या स्पष्टीकरणामुळे निर्माण झाला आहे. तसेच हुती बंडखोरांना न्यायालय चालविण्याचा अधिकार आहे का, असेही विचारले जात आहे. त्या हुती बंडखोरांच्या ताब्यात असतील, तर त्यांच्या जीवाला तत्काळ धोका संभवू शकतो. कारण, हुतींवर तेथील अधिकृत राष्ट्राध्यक्षांचाही अधिकार चालत नाही. त्यामुळे आता भारत सरकारला हुती बंडखोरांशी चर्चा करावी लागणार का, असाही प्रश्न निर्माण झाला असून, एकंदर प्रिया यांचे भवितव्य धोक्यात असल्याची चर्चा आहे.