For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

SP मोहन दहिकरांची पोलिस फोर्समधून हकालपट्टी करा

03:56 PM May 30, 2026 IST | अनुजा कुडतरकर
sp मोहन दहिकरांची पोलिस फोर्समधून हकालपट्टी करा
Advertisement

सिंधुदुर्गात गुन्हेगारांना पोलिसांचेच "वरदहस्त" ; आ .निलेश राणेंचे खळबळजनक आरोप

Advertisement

ओरोस । प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारांना पोलिसांचेच अभय मिळत असून, कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे,असा आरोप करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. श्री दहिकर यांच्या कार्यकाळात जिल्ह्याचे प्रचंड नुकसान होत असल्याचे सांगत, त्यांची तातडीने हकालपट्टी करण्याची थेट मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार राणे यांनी जाहीर केले.
​सिंधुदुर्ग नगरी येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, युवक जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा परिषद सदस्य केशव नारकर आणि जिल्हा बँक संचालक संदीप परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.​पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, डॉ. मोहन दहिकर यांनी २२ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारला, मात्र त्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात पोलिस प्रशासनाला पूर्णपणे अपयश आले आहे. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे दाखल असून त्यातील अनेक प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण अत्यंत कमी आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.​गोवा बनावटीची अवैध दारू तस्करी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेला मोठा शाप असल्याचे सांगत राणे यांनी पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षमतेवर थेट बोट ठेवले. गोव्यातून सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर दारू आणली जाते, मात्र या वाहतुकीवर पोलिसांकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नाही. आश्चर्यकारक बाब म्हणजे, जी अवैध दारू पकडली जाते ती बहुतांश वेळा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरात पकडली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत पोलिस अधीक्षकांच्या कार्यकाळात एकदाही मोठी कारवाई झालेली दिसत नाही. काही विशिष्ट वाहनांद्वारे गोव्यातून ही दारू वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावर बोलताना राणे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ लहान-मोठ्या आरोपींना पकडून पोलिस आपली पाठ थोपटून घेत आहेत, मात्र ड्रग्ज आणि गांजा पुरवठ्याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, तिथपर्यंत पोलिस पोहोचतच नाहीत. यामुळे आरोपी दुसऱ्याच दिवशी जामिनावर सुटून बाहेर येतात. अमली पदार्थांची मुख्य पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी आवश्यक असलेला सखोल तपास कुठेही होताना दिसत नाही.​यावेळी त्यांनी दोडामार्ग तालुक्याबाबत एक अत्यंत गंभीर आरोप केला. दोडामार्ग तालुक्यात रबर शेतीच्या नावाखाली गांजाची बेकायदेशीर लागवड होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या भागात सुमारे १८०० हेक्टर क्षेत्र रबर लागवडीखाली असून, तेथे स्थानिक नागरिकांनाही सहज प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण संशयास्पद भागात विशेष शोध मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.​गो-तस्करीच्या मुद्द्यावर बोलताना राणे म्हणाले की, जिल्ह्यात बेकायदा गोमांस विक्री आणि गो-तस्करी राजरोसपणे सुरू असून याची माहिती सर्वांनाच आहे, मात्र तरीही पोलिस यावर ठोस कारवाई करत नाहीत. याशिवाय, रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे वाजणाऱ्या ध्वनिक्षेपकांबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.​पत्रकार परिषदेच्या शेवटी आमदार निलेश राणे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (एलसीबी) काही अधिकाऱ्यांवर थेट आणि खळबळजनक आरोप केले. जिल्ह्यातील अवैध धंद्यांकडून कथित हप्ते गोळा करण्याचे काम काही पोलिस अधिकारी करत असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस प्रशासनातील हा कथित भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांना मिळणारे अभय यामुळे जिल्ह्याची शांतता धोक्यात आली असून, यासाठी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा पुनरुच्चार राणे यांनी केला. या सर्व गंभीर बाबी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दहिकर यांच्या बदलीची मागणी लावून धरली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.