For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करा; आमदार निलेश राणेंचे प्रशासनाला निर्देश

12:24 PM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
वराड तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करा  आमदार निलेश राणेंचे प्रशासनाला निर्देश
Advertisement

कट्टा | वार्ताहर : मालवण तालुक्यातील ऐतिहासिक वराड तलावाची पाहणी आमदार निलेश राणे यांनी केली. तलावाची सध्याची स्थिती, पाणी साठवण क्षमता आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतल्यानंतर तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

Advertisement

वराड तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता उपलब्ध असली तरी तलावात साचलेला गाळ, काही ठिकाणी होणारी गळती तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे उपलब्ध क्षमतेचा पूर्णपणे वापर होत नसल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे गाळ उपसा, गळतीच्या ठिकाणी दुरुस्ती आणि आवश्यक तांत्रिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार राणे यांनी दिल्या.

तलावाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तलावाची सद्यस्थिती, गाळाचे प्रमाण, पाणी साठवण क्षमता आणि आवश्यक कामांचा आढावा घ्यावा. त्यानंतर सविस्तर अहवाल तयार करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार राणे यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांना दिले.

Advertisement

जलस्रोत सक्षम करण्यावर भर

मालवण तालुक्यातील उपलब्ध जलस्रोत अधिक सक्षम करून त्यांचा दीर्घकालीन आणि प्रभावी वापर करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तलावाची क्षमता वाढल्यास परिसरातील पाणी उपलब्धतेला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचा अधिकाधिक वापर होण्यासाठी आवश्यक कामे प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

वराड तलावातील गाळ उपसा आणि दुरुस्तीची कामे करताना तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून नियोजन करण्याचेही निर्देश देण्यात आले. प्रशासनाकडून अहवाल तयार झाल्यानंतर आवश्यक कामांना गती देण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही अपेक्षित आहे.

या पाहणीवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, संबंधित अधिकारी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.