For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा खपवून घेणार नाही; आमदार निलेश राणेंचा कडक इशारा; मालवण तालुक्यातील आठ गावे, 434 वाड्यांसाठी 7 कोटी 49 लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा

05:03 PM Oct 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा खपवून घेणार नाही  आमदार निलेश राणेंचा कडक इशारा  मालवण तालुक्यातील आठ गावे  434 वाड्यांसाठी 7 कोटी 49 लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा
Advertisement
मालवण : संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. शासकीय कामांच्या नावाखाली अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून लोकांची अडवणूक करू नका. सरसकट पंचनामे करून गरजू नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा. अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा आणि चुकीचा कारभार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार डॉ. निलेश राणे यांनी दिला.

समर्थ मंगल कार्यालय, कोळंब येथे आमदार डॉ. निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सन 2026-27 च्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मालवण तालुक्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती, बंधाऱ्यांची सद्यस्थिती, टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Advertisement

बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बाबा परब, सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, किसन मांजरेकर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

बंधाऱ्यांच्या कामावर राणेंची नाराजी

आढावा बैठकीदरम्यान लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर आमदार राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी तयार करण्यात आलेली अंदाजपत्रके चुकीची असून ती प्रत्यक्ष परिस्थितीशी सुसंगत नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.

Advertisement

विभागाने 154 बंधाऱ्यांची माहिती सादर केली असली, तरी प्रत्यक्षात केवळ 36 बंधाऱ्यांमध्येच योग्य पद्धतीने पाणी अडवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बंधाऱ्यांच्या कामांसाठी दाखवण्यात आलेला 2 कोटी 64 लाख रुपयांचा खर्च आणि कामांची प्रत्यक्ष स्थिती याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश बंधारे निकामी किंवा अयोग्य स्थितीत आहेत.

अधिकारी बंधाऱ्यांची पाहणी केल्याचा दावा करतात; मात्र प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी पुरेशी उपस्थितीही दिसून आली नसल्याचे राणे यांनी नमूद केले. अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

जानेवारीपासून टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन करा

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांना सुरुवात करावी, असे निर्देश आमदार राणे यांनी दिले. जानेवारी महिन्यापासून नागरिकांना टँकरद्वारे सुरळीत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी टँकरची उपलब्धता, आवश्यक व्यवस्था आणि संपूर्ण आराखडा आताच अंतिम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तालुक्यात सुमारे ३५ टक्के वनराई बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र, ज्या भागांमध्ये पाण्याची अधिक गरज आहे, त्या ठिकाणी प्राधान्याने कामे पूर्ण करावीत, असे राणे यांनी स्पष्ट केले. पाणी अडवणे, उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे आणि भविष्यातील टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या कचाट्यात अडकवू नका

पाणीटंचाई आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासकीय मदत मिळवताना अडचणी येऊ नयेत, यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन राणे यांनी केले. तहसीलदारांनी सर्व ग्रामसेवकांना स्पष्ट सूचना द्याव्यात आणि अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून मदत प्रक्रियेत विलंब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

मालवण तालुक्यातील शेतकरी आणि मच्छीमार स्वाभिमानी आहेत. मात्र, संकटाच्या काळात त्यांना मदतीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याला सरसकट मदत मिळाली पाहिजे, अशी भूमिका आमदार राणे यांनी मांडली.

गावागावांतील पाणीप्रश्न बैठकीत मांडा

बैठकीत उपस्थित ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना राणे यांनी गावातील पाणीटंचाईचे प्रश्न मोकळेपणाने मांडण्याचे आवाहन केले. गावांमधील किंवा वाड्यांमधील पाणीटंचाईशी संबंधित कोणताही प्रश्न राहून जाऊ नये, यासाठी सर्व विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित असताना आवश्यक मागण्या नोंदवाव्यात, असे त्यांनी सांगितले.

विहिरी, नळपाणी योजना आणि कृषी विभागाशी संबंधित अडचणी बैठकीतच मांडाव्यात. आजच्या बैठकीतील चर्चेच्या आधारे निधीची तरतूद आणि उपाययोजनांचे नियोजन करता येईल. नंतर नवीन प्रस्ताव सादर केल्यास त्यावर कार्यवाही होण्यास विलंब होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आठ गावे,434  वाड्यांसाठी 7 कोटी 49 लाखांचा आराखडा

या बैठकीत मालवण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील आठ गावे आणि 434 वाड्यांसाठी एकूण 7 कोटी 49 लाख 5 हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्यात पाणीटंचाई निवारणासाठी काही नवीन कामांचाही समावेश करण्याची सूचना करण्यात आली.

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करावा आणि नागरिकांना वेळेत मदत मिळेल याची खात्री करावी, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

Advertisement
Tags :

.