भातशेतीच्या नुकसानीची पाहणी; चौकेत सरसकट पंचनाम्याचे आमदार निलेश राणेंचे निर्देश
चौके, प्रतिनिधी : पावसाअभावी आणि बदलत्या हवामानामुळे चौके परिसरातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. भात तयार होण्यापूर्वीच पिके करपून जात असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मंगळवारी आमदार निलेश राणे यांनी चौके परिसरातील नुकसानग्रस्त भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी नुकसानग्रस्त भातशेतीचे तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकर मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक खर्च आणि मेहनत करून भातशेती केली आहे. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने तीव्र उन्हाचा फटका पिकांना बसत असून डोळ्यादेखत शेती करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यावेळी मालवण तहसीलदार गणेश लव्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, पंचायत समिती गटविकास अधिकारी जाधव, मंडल अधिकारी अलकुटे, चौके तलाठी पी. जी. गुरव, जिल्हा परिषद सदस्या अक्षता गावडे, मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती श्याम झाड, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, माजी सरपंच राजन गावडे, कृषी अधिकारी धनंजय गावडे, कृषी सहाय्यक स्नेहा खोत, चौके सरपंच शिवप्रसाद चौकेकर यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकरी गणू गावडे, गंगाराम गावडे, हरी चव्हाण, आबा गावडे, राघो गावडे, सुभाष चौककर, मोहन गावडे, भाई गावडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.