For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुख्यात गुंड निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

01:56 PM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
कुख्यात गुंड निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष  पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय
Advertisement

पुणे : कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासह सर्व आरोपींची विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांमध्ये अभियोजन पक्षाच्या आरोपांना पुष्टी मिळाली नसल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.

Advertisement

2020 मध्ये निलेश घायवळ कारागृहात असताना संतोष धुमाळ याने फिर्यादीकडे त्याच्या भावाच्या रॅलीसाठी जीप देण्याच्या नावाखाली खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. गुन्हे शाखेने तपास करून प्रकरण उघडकीस आणले होते.

मात्र, न्यायालयीन सुनावणीदरम्यान फिर्यादी आपल्या पूर्वीच्या आरोपांपासून मागे हटला. पोलिसांच्या दबावाखाली मूळ तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा त्याने न्यायालयात केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवलेल्या जबाबातही संबंधित घटना घडली नसल्याचे त्याने सांगितले. तसेच अन्य साक्षीदार आणि पंच साक्षीदारांनीही अभियोजन पक्षाच्या आरोपांना दुजोरा दिला नाही. परिणामी, पुराव्याअभावी विशेष मोक्का न्यायालयाने निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Advertisement

दरम्यान, निलेश घायवळविरोधात पुण्यात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल झाले आहेत. 2021 मध्ये त्याला पुण्यातील एका दरोड्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. 2022 मध्ये त्याला न्यायालयाने जामीन मंजूर करताना पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश दिले होते.

अलीकडील काळात पुणे पोलिसांनी घायवळ टोळीविरोधात कारवाई तीव्र केली होती. कोथरूडमधील गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ टोळीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर निलेश घायवळ परदेशात गेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. त्याच्याविरोधात इंटरपोलमार्फत नोटीस जारी करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

मात्र, खंडणीच्या या प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने निलेश घायवळला मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Tags :

.