For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime १४ वर्षाच्या बालकावर गोळी झाडणाऱ्या क्रूरकर्मा गडदे याला चार दिवसांची कोठडी

03:38 PM Jun 16, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
sangli crime १४ वर्षाच्या बालकावर गोळी झाडणाऱ्या क्रूरकर्मा गडदे याला चार दिवसांची कोठडी
Advertisement

। प्रतिनिधी, सांगली

Advertisement

रेल्वे मालधक्का ठेवण्याच्या वादातून हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर (वय १४) याचा गोळी झाडून खून करणाऱ्या गुंड निलेश गडदे याला सांगली पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवारी न्यायालयासमोर त्याला उभे केले असता त्याला न्यायालयाने चार दिवसाची कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आणखीन दोन संशयित असल्याचे समोर आले आहे. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती तपास अधिकारी स्थानिक गुन्हा अन्वेषणाचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

मंगसुळी-लक्ष्मीनगर येथे मुसक्या आवळल्या

गुंड निलेश गडदे याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणाच्या एका पथकाने सीमाभागातील मंगसुळी-लक्ष्मीनगर येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले. त्यानंतर सांगली आणल्यावर त्याला रविवारी रात्री अटक दाखवण्यात आली. सोमवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी निलेश गडदे याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता याप्रकरणी आणखीन दोन संशयित असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या शोधात आता स्थानिक गुन्हा अन्वेषणाचे एक पथक मार्गस्थ झाले आहे. या दोघांनाही तात्काळ अटक करण्यात येणार असल्याचेही झाडे यांनी सांगितले.

Advertisement

खूनानंतर घेतले देवदर्शन

वेदांत बंडगर याचा खून केल्यानंतर निलेश गडडे हा थेट कोल्हापूर येथे जाऊन त्याने महालक्ष्मीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर एका पीराचेही दर्शन घेऊन तो पुण्यात गेला होता. पुण्यात एका ठिकाणी लपून बसल्यावर त्याला याठिकाणी धोका असल्याचे लक्षात आल्यावर त्याने त्याठिकाणाहून पळ काढला आणि सीमभागातील मंगसुळीच्या एका लॉजमध्ये तो लपून बसला होता. त्याठिकाणची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषणाच्या पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले आहे.

गावठी रिव्हाल्वर, गाडी जप्त होणार

या खूनप्रकरणात वापरण्यात आलेली चारचाकी गाडी तसेच गावठी रिव्हाल्वर याचा शोध पोलिसांच्याकडून सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही गोष्टी जप्त करण्यात येणार आहेत. दरम्यान या प्रकरणांत गडडे याच्याबरोबर असणारी मैत्रिण ही खून झाल्यानंतर त्याच्याबरोबर होती की आधी होती, याचाही तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात धक्कादायक माहितीही पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणांत राजकीय नेत्यांचेही काही फोन पोलीस अधिकाऱ्यांना गेले असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या राजकीय नेत्यांचीही चौकशी होणार का असा सवालही आता जनतेतून होत आहे.

निलेश गडडे याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू

दरम्यान निलेश गडडे याचा एक साथीदार अतुल दादासाहेब उर्फ पोपट वायदंडे याला अटक केली आहे. पण उर्वरित साथीदार किरण शंकर लोखंडे (रा. वाघमोडेनगर, कुपवाड), विशाल बिरदेव चौगुले, नानासाहेब उर्फ सागर माणिक चौगुले (रा. अग्रण धुळगाव, ता. कवठेमहांकाळ) याच्या शोधासाठी पोलिसांची पथके अद्यापि बाहेर आहेत. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.