निलण्णावरला न्यायालयीन कोठडी
9 जूनपर्यंत हिंडलगा कारागृहात रवानगी : वकिलांमार्फत जामिनासाठीही प्रयत्नशील
बेळगाव : बहुचर्चित शिवम असोसिएट्सच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या संस्थेचा सर्वेसर्वा शिवानंद निलण्णावरची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 9 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. 14 मे रोजी पोलीस, महसूल व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी शिवबसवनगर येथील शिवम असोसिएट्सच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करून शिवानंद निलण्णावरला अटक करण्यात आली होती. याचदरम्यान प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्यामुळे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला दहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले होते.
सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी शिवानंदला बेंगळूरला नेऊन त्याची चौकशी केली आहे. सोमवारी रात्री उशिरा शिवानंदसह सीआयडीचे पथक बेळगावला दाखल झाले. मंगळवारी 26 मे रोजी त्याच्यासंबंधीची वाहने जप्त करण्यात आली. कन्नड संघटनेचा नेता अभिलाष याचीही माळमारुती पोलीस स्थानकात चौकशी करण्यात आली.पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे बुधवारी 27 मे रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने 9 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्यामुळे त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. दरम्यान, त्याचे वकील अॅड. आर. जी. पाटील यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे.
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याआधी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिवानंदची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सीआयडी अधिकाऱ्यांबरोबरच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी न्यायालय आवारात उपस्थित होते. दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले. शिवानंदने न्यायालयासमोर आपल्या आरोग्याविषयी तक्रारी सांगितल्या. आरोग्याच्या तक्रारी असल्यास कारागृहातील डॉक्टर तपासणी करून तुमच्यावर उपचार करतात, पुढील उपचाराची गरज असल्यास तुमच्या वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल करा, असे न्यायाधीशांनी सांगितले.