‘माझ्या यशाचा फायदा घेऊ नका’; नीला विखे पाटील यांचा काका राधाकृष्ण, चुलत भाऊ सुजय यांच्यावर निशाणा
स्टॉकहोम : स्वीडनच्या संसदेत (रिक्षदाग) निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांनी आपल्या काका आणि महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच चुलत भाऊ व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. आपल्या राजकीय यशाचे श्रेय विखे पाटील कुटुंबाशी जोडण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
पीटीआयशी स्टॉकहोममधून बोलताना नीला विखे पाटील यांनी सांगितले की, एका व्यक्तीने त्यांना एक व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओमध्ये सुजय विखे पाटील विखे कुटुंबाचा संदर्भ देत, महाराष्ट्रात स्वतःचा पराभव झाला असला तरी कुटुंबातील आणखी एक सदस्य स्वीडनमध्ये खासदार झाल्याचा उल्लेख करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नीला यांनी गेल्या दशकभरात काका राधाकृष्ण विखे पाटील किंवा चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्याशी आपला कोणताही संपर्क नसल्याचे म्हटले. त्या नियमितपणे भारतात येत असल्या तरी आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या यशाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सूचित केले.
नीला विखे पाटील या शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. त्या स्वीडनच्या ग्रीन पार्टीच्या नेत्या असून, 13 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या निवडणुकीत स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून स्वीडनच्या 349 सदस्यांच्या संसदेत निवडून आल्या. स्वीडिश संसदेच्या अधिकृत नोंदीनुसार त्यांचा कार्यकाळ 28 सप्टेंबर 2026२पासून सुरू होणार आहे.
कोण आहेत नीला विखे पाटील?
स्वीडनमध्ये जन्मलेल्या नीला यांचे बालपण महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये गेले. त्यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस तसेच माद्रिदमधील कॉम्प्लुटेन्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले. स्वीडनच्या माजी पंतप्रधान स्टेफान लोफव्हेन यांच्या कार्यालयात त्यांनी राजकीय सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
नीला यांच्या स्वीडनमधील राजकीय प्रवासामुळे महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाचे नाव आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेत आले आहे. मात्र, आपल्या राजकीय वाटचालीचे श्रेय कुटुंबीयांपेक्षा स्वतःच्या राजकीय प्रवासाला देण्याचा स्पष्ट संदेश त्यांनी या वक्तव्याद्वारे दिला आहे.