निक्की हेलींच्या पुत्राचे भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य
भारत सरकारबद्दल काढले अनुद्गार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारतीय वंशाच्या अमेरिकन मुत्सद्दी निक्की हेली यांचे पुत्र नलिन हेली यांनी पुन्हा एकदा भारतासंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. हेलींच्या पुत्राने यावेळी भारतावर टीका करताना स्वत:च्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याने एका वक्तव्यात भारत सरकारला ‘चीप’ संबोधिले आहे. भारत अमेरिकेचा सहकारी नाही आणि भारत अनेक देशांकडून स्वस्त सामग्री खरेदी करतो, कारण तेथील सरकराचे स्वस्त आहे अशी आक्षेपार्ह टिप्पणी त्याने केली आहे.
अमेरिकेने भारतासोबत राजनयिक संबंध कायम राखण्यालाही त्याने विरोध दर्शविला आहे. भारत अमेरिकेचा विश्वसनीय सहकारी ठरला नसल्याचा युक्तिवाद त्याने केला आहे. भारत अमेरिकेत स्वस्त कामगार पाठवतो, इराणमधून स्वस्त कच्चे तेल खरेदी करतो आणि रशियाकडून स्वस्त शस्त्रास्त्रs खरेदी करतो कारण भारताचे सरकार स्वस्त आहे. हा प्रकार केवळ भारतापुरती मर्यादित नाही. अमेरिकेला अनेक सहकाऱ्यांसोबतच्या स्वत:च्या संबंधांचे पुन्हा मूल्यांकन करण्याची गरज असल्याचे नलिन हेलीने म्हटले आहे.
हेलीने यापूर्वी देखील भारताच्या विरोधात वक्तव्यं केली होती. त्याने अनेकदा स्वत:ला स्वत:च्या भारतीयत्वापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भारताने अमेरिकेसमोर एच-1बी व्हिसा प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा हेलीने भारताची भूमिका प्रोफेशनल्सची चिंता कमी आणि त्यांच्याकडून पाठविण्यात येणाऱ्या पैशांना खिशात टाकण्याच्या इच्छेने अधिक प्रेरित असल्याचा आरोप केला होता. नलिन हेली हा एच-1बी व्हिसा कार्यक्रमाचा प्रखर टीकाकार राहिला असून तो ही पद्धत पूर्णपणे संपुष्टात आणण्याची मागणी करत राहिला आहे.