For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या न्यायालयात निखिल गुप्ताचा निर्दोषत्वाचा दावा

06:43 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या न्यायालयात निखिल गुप्ताचा निर्दोषत्वाचा दावा
Advertisement

दहशतवादी पन्नू हत्या कट प्रकरण : 28 जूनपर्यंत  कोठडीत रवानगी

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा अयशस्वी कट रचल्याप्रकरणी आरोपी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अमेरिकेच्या मॅनहॅनच्या संघीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यादरम्यान गुप्ताने हत्येचा कट रचल्याचा आरोप नाकारत निर्दोष असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या संघीय तपास यंत्रणेने गुप्तावर भारत सरकारच्या आदेशानुसार अमेरिकेच्या भूमीवर पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

अमेरिकेच्या विनंतीनुसार चेक प्रजासत्ताकने निखिल गुप्ताला मागील वर्षी अटक केली होती. तर मागील आठवड्यात 14 जून रोजी त्याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले होते.

28 जूनपर्यंत कोठडी

दक्षिण न्यूयॉर्कच्या संघीय न्यायालयाचे न्यायाधीश जेम्स कॉट यांनी 28 जून रोजी होणाऱ्या सुनावणीपर्यंत गुप्ताला कोठडी सुनावली आहे. गुप्ताचे वकील जेफ्री चॅब्रो यांनी जामिनासाठी अर्ज केला नाही. हे प्रकरण अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांसाठी जटिल आहे. प्रक्रियेच्या प्रारंभिक टप्प्यात निष्कर्ष काढणे टाळणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या प्रकरणात समोर येणारी पार्श्वभूमी आणि तपशील तपास यंत्रणेच्या आरोपांना फेटाळण्यास पुरेसा ठरू शकतो असा दावा चॅब्रो यांनी केला आहे.

शाकाहारी भोजनाची मागणी

निखिल गुप्ता यांचा पूर्ण शक्तिनिशी न्यायालयात बचाव करू. बर्हिगत दबावानंतरही त्याला पूर्ण संधी मिळेल हे सुनिश्चित करणार आहोत. न्यायालयाच्या निष्कर्षांतून समोर येणाऱ्या गोष्टींमुळे भारत आणि अमेरिकेदरम्यान राजनयिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. निखिल गुप्ता हे शाकाहारी असल्याने त्यांना तुरुंगात शाकाहारी भोजन पुरविण्यात यावे अशी विनंती चॅब्रो यांनी न्यायालयासमोर केली.

चेक प्रजासत्ताकमधून प्रत्यार्पण

चेक प्रजासत्ताकमधून प्रत्यार्पण झाल्यावर गुप्ताला ब्रुकलिनच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी चेक प्रजासत्ताकमध्ये अटक झाल्यावर अमेरिकेने गुप्ताच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. गुप्ताने प्रत्यार्पणाच्या विरोधात तेथील घटनात्मक न्यायालयात याचिका दाखल केली होती. मागील महिन्यात त्याची ही याचिका फेटाळण्यात आल्यावर त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला होता. निखिलचे प्रत्यार्पण हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी झाले होते.

अमेरिकेने कठोर प्रत्युत्तर द्यावे!

अमेरिकेच्या डेमोक्रेटिक सिनेटर्सच्या एका शक्तिशाली समुहाने पन्नूच्या हत्येच्या अयशस्वी कटामधील भारत सरकारच्या सहभागाच्या आरोपांवर बिडेन प्रशासनाला कठोर राजनयिक प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांना लिहिलेल्या पत्रात सिनेटर जेफ मर्कले, रान विडेन, टिम कॅन, बर्नी सँडर्स आणि क्रिस वॅन होलेन यांची स्वाक्षरी आहे. भारताने जागतिक नेतृत्वाची आकांक्षा बाळगताना स्वत:च्या देशातील आणि विदेशातील मानवाधिकारांच्या सन्मानाबद्दल स्वत:ची प्रतिबद्धता कायम राखावी असे या सिनेटर्सनी पत्रात म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.