निखत, प्रिया, प्रीती उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/, उलानबातार
येथे सुरु असलेल्या 2026 च्या आशियाई मुष्ठियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेतील पाचव्या दिवशी भारताच्या महिला मुष्ठियोद्ध्या निखत झरीन, प्रिया आणि प्रिती पवार यांनी आपल्या वजन गटातून उपांत्य फेरी गाठली आहे. या कामगिरीमुळे भारताने या स्पर्धेतील आपली तीन पदके निश्चित केली आहेत.
महिलांच्या 51 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या निखत झरीनने फिलिपिनच्या झियान बेगुहिनचा सरस गुणावर पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आता निखत झरीनचा उपांत्य फेरीचा सामना चीनच्या वू यू बरोबर होईल. चीनच्या यू ने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.
महिलांच्या 60 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात भारताच्या प्रियाने चीनच्या चेंगयू यांगचा 4-1 अशा गुणांनी दणदणीत पराभव करत शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले. प्रियाचा उपांत्य फेरीचा सामना मंगोलियाच्या नेमून माँकोरशी होईल.
महिलांच्या 54 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या प्रीती पवारने मंगोलियाच्या मुनगुनसेसंगचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत प्रीतीची लढत कोरीयाच्या अॅजेशी होणार आहे. या स्पर्धेत पुरुषांच्या 70 किलो वजन गटात भारताच्या दीपकचा जॉर्डनच्या झेयादने 1-4 अशा गुणांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत भारताने आपली तीन पदके निश्चित केली आहेत.