अनुदान मिळत नसल्याने सरकारविरुद्ध निजद आमदाराची रिट याचिका
बेंगळूर : मतदारसंघाच्या विकासासाठी निधी न दिल्याबद्दल कोलारच्या श्रीनिवासपूर मतदारसंघातील निजद आमदाराने राज्य सरकारविरुद्ध कायदेशीर लढा हाती घेतला आहे. आमदार जी. के. वेंकटशिव रेड्डी यांनी सरकारकडून दुजाभाव केला जात असून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत सरकारच्या धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. सरकार माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी देत नाही. अनुदान देण्याची सरकारकडे विनंती केली आहे. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मतदारसंघासाठी अनुदान मिळवून द्यावे, अशी विनंती आमदार वेंकटशिव रेड्डी यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे.
सरकारने मागील महिन्यात काँग्रेस आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रु. जाहीर केले होते. मात्र, निजद आणि भाजप आमदार असलेल्या मतदारसंघांना निधी न दिल्याबद्दल सरकारवर टीका झाली होती. वारंवार विनंती करूनही अनुदान मंजूर न केलेले नाही. सरकारने संविधानाच्या कलम 14 अंतर्गत समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन केले आहे, असा ठपका ठेवत वेंकटशिव रेड्डी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला असतानाही अनुदान मिळालेले नाही, असा उल्लेख त्यांनी रिट याचिकेत केला आहे.