निहाल सरिनला टाटा स्टील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद
वृत्तसंस्था/ कोलकाता
युवा भारतीय ग्रँडमास्टर निहाल सरिनने टाटा स्टील चेस इंडिया स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. ज्या आजोबांनी त्याला या खेळाची ओळख करून दिली होती त्यांच्या निधनानंतर अवघ्या एका दिवसाने निहालने रॅपिड विजेतेपदावर आपले नाव कोरले. निहालने नवव्या फेरीत पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदविऊद्ध शांतपणे सामना बरोबरीत सोडवत खुल्या गटातील विजेतेपद निश्चित केले. या निकालामुळे 21 वर्षीय निहालने 6.5 गुणांसह पहिले स्थान मिळवले.
आनंदने सहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले, तर अलीकडेच दोहा येथे झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी कांस्यपदक विजेता ठरलेल्या अर्जुन एरिगेसीने पाच गुणांसह तिसरे स्थान मिळवले. ‘आदल्या रात्री मला बातमी मिळाली की, ज्या आजोबांनी मला बुद्धिबळ शिकवले होते त्यांचे निधन झाले आहे. मी या स्पर्धेतील विजय त्यांना समर्पित करू इच्छितो’, असे निहाल म्हणाला.
महिलांच्या गटात रशियाच्या कॅटेरिना लॅग्नोने प्रभावी कामगिरी करत 6.5 गुणांसह विजेतेपद पटकावले. रशियाच्याच अलेक्झांड्रा गोर्याचकिनाने पाच गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुख (4.5 गुण) कांस्यपदकाची मानकरी ठरली. त्यापूर्वी सातव्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजरातीने आनंदसोबतचा सामना बरोबरीत सोडवला, तर अमेरिकन ग्रँडमास्टर हॅन्स निमनने अरविंद चिदंबरमला पराभूत केले. निहाल आणि आर. प्रज्ञानंद यांच्यातील सामना अखेरपर्यंत रंगला आणि अखेरीस दोघांनी बरोबरीवर समाधान मानले.
आठव्या फेरीत प्रज्ञानंदने आनंदला आश्चर्यचकित केले, परंतु शेवटी सामना बरोबरीत सुटला. निहालने उत्कृष्ट बचाव करत अमेरिकेच्या वेस्ली सो याचा प्रयत्न हाणून पाडला, तर मुर्झिनने अरविंदला पराभूत करून आपली विजयी मालिका सुरू ठेवली. शेवटच्या फेरीत निहालने आनंदसोबतचा सामना बरोबरीत सोडवून विजेतेपद पटकावले. महिलांच्या सामन्यांमध्ये कॅटेरिनाने रक्षिता रवीच्या अंतिम टप्प्यातील चुकीचा फायदा घेतला, तर दिव्या देशमुखने सुऊवातीची पिछाडी भरून काढून वंतिका अग्रवालला हरवले. आर. वैशालीने कॅरिसा यिपला पराभूत करताना जोरदार हल्ला चढवला. आठव्या फेरीत दिव्या ही एकमेव विजेती ठरली. तिने सततच्या दबावाचे निर्णायक फायद्यात रूपांतर करून वैशालीला हरवले. पण एक फेरी बाकी असतानाच लॅग्नोने अभेद्य आघाडी घेत पहिले स्थान निश्चित केले होते.