घनकचरा व्यवस्थापनात निगवे दुमाला बनलेय रोल मॉडेल
शिये :
निगवे दुमाला (ता.करवीर) येथील ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव कचरामुक्त करून स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी कचऱ्याबाबत केलेल्या विविध उपाययोजना जिह्यातील इतर गावांनाही मार्गदर्शक ठरणार आहेत. तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी गावाला भेट देऊन गाव घनकचरा व्यवस्थापनाचे रहस्य जाणून घेत आहेत. त्यामुळे निगवे दुमाला गाव इतरांसाठी रोल मॉडेल ठरणार आहे.
गावापासून शहरापर्यंत सगळीकडे कचऱ्याची समस्या आहे. बहुतांशी सर्वच ठिकाणी कचरा गोळा करून एका जागी साठवला जातो. सुका कचरा पेटवला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. ओल्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया न झाल्याने दुर्गंधी पसरते. परिणामी संसर्गजन्य साथींचा धोका वाढतो आहे. शासनाने कचऱ्यावर प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केलेला असतो. तोही निधी कचऱ्यात जातो, अशी अवस्था आहे. यावर मात करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनात निगवे दुमाला ग्रामपंचायतीने केलेल्या विविध उपाययोजनांची चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय व शेतीतील विविध प्रयोगाबाबत निगवे दुमाला संवेदनशील मानले जाते. गावातील सरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी गावातील कचरा उठाव करून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला घंटागाडीतून कचरा संकलनास सुरुवात केली. घंटागाडी सार्वजनिक ठिकाणचा व घरगुती कचरा गोळा करू लागली. तो कचरा गावाबाहेरील माळरानावर एकत्र जमा केला. पण त्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने परिसरात दुर्गंधी पसरू लागली. त्याचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर परीणाम होऊ लागला. ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने तो कचरा पडीक विहिरीत टाकून तो नष्ट केला. त्यानंतर या कचऱ्यावर कायमस्वरूपी तोडग्यासाठी ग्रामपंचायतीने कचरा विलगीकरणासाठी माळावर स्वच्छ भारत अभियानांतर्गत कमी खर्चात प्रकल्प शेड बनवले.
त्या शेडमध्ये ओला आणि सुका कचरा बाजूला करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. ओला व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करणे त्यांना शक्य होईना. परिणामी पुन्हा कचरा एका जागी साठून राहू लागला. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याबाबत जनजागृती केली. घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा विलगीकरणासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य गिरीश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. घरातील ओला अन् सुका कचरा घरातील व्यक्तींनी वेगवेगळ्या बकेटमध्ये गोळा करण्यास सुरूवात झाली. तसेच घंटागाडी आली की त्यामध्येही ओला व सुका कचरा वेगवेगळ्या ठिकाणी संकलित करण्याची व्यवस्था लावली. त्यामुळे हा कचरा शेडमध्ये टाकल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांना विलगीकरणास सोपे जाऊ लागले.
हे कर्मचारी सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, पुट्टे, प्लास्टिक बाटल्या बाजूला करून त्याच्या बॅगा भरून ठेवतात. हे प्लॅस्टिक पुढील प्रक्रियेसाठी अवनी संस्थेला दिले जाते. ओला कचरा जमा करण्यासाठी कंपोस्ट पीठ बांधले आहे. त्यामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानंतर खत तयार होते. या खताला शेतकऱ्यांतून मोठी मागणी आहे. या घनकचरा प्रकल्पावर पाच कर्मचारी आहेत. ग्रामपंचायतीने कचऱ्याबाबत योग्य नियोजन लावल्याने ओल्या व सुक्या कचऱ्यातून अर्थाजन होऊन गाव ही स्वच्छ आणि सुंदर झाले आहे.
गावात स्वच्छ भारत मिशन यशस्वी
गाव कचरामुक्त करण्यासाठी गावकऱ्यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. परीणामी स्वच्छ भारत मिशन गावात यशस्वी ठरले.
सरपंच सौ. रूपाली पाटील
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अंतीम टप्प्यात
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनात ग्रामपंचायत यशस्वी ठरली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित असून त्याचेही काम लवकरच पूर्णत्वास येईल. यासाठी जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
संजय शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामस्थांचे सहकार्य राहणार
ग्रामपंचायत प्रशासनाने कचऱ्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे गावातील कचरा उठाव झाल्यामुळे गाव स्वच्छ झाले आहे. या कामाला ग्रामस्थ म्हणून यापुढेही सहकार्य राहणार आहे
बाळकृष्ण जाधव, ग्रामस्थ
प्रतिदिन जमा होणारा कचरा (अंदाजे)
ओला कचरा रोज 520 किलो
सुका कचरा 140 किलो
ओल्या व सुक्या कचऱ्यापासून मिळणारे वार्षिक उत्पन्न
सुमारे 35 ते 40 हजार रुपये.
कचरा गोळा करून प्रक्रियेपर्यंत येणारा वार्षिक खर्च (अंदाजे)
3 लाख 87 हजार रुपये.