निगुडे माऊली रवळनाथ पंचायतन देवतांच्या पुनःप्रतिष्ठापना सोहळ्याला प्रारंभ
प्रतिनिधी
बांदा
निगुडे येथील श्रीदेवी माऊली रवळनाथ परिवार पंचायतन देवतांची पुनःप्रतिष्ठापना सोहळ्याला सोमवार ३ पासून प्रारंभ झाला. यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत. पुनःप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्त सोमवार ३ फेब्रुवारी रोजी मंगलाचरण, पुराणोक्त, संपूर्ण प्रायश्चित्त विधी, देवतांना निमंत्रण, गणेश पूजनादी संपूर्ण पुण्याहवाचन, संभारदान, वेदोक्त प्रायश्चितविधी, कुष्मांड होम, पवमान आवृत्या, कर्मसमाप्ती आदी धार्मिक कार्यक्रम झाले. मंगळवारी व बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रम व सायंकाळी गणेश जोशी गुरुजी यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. आज गुरुवार ६ रोजी सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वा. ह. भ. प. शारदा आरोंदेकर यांचे सुश्राव्य किर्तन होईल.
शुक्रवार ७ रोजी सकाळी ७ वा. मंगलाचरण, आवाहीत देवतांची पूजा, गावचे शिमधडे इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली व रोणापाल गावचे मानकरी यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजून १४ मिनिटे या शुभ मुहूर्तावर श्री मठसंस्थान दाभोली पिठाधीश श्रीमद दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते शिखर कलशाची स्थापना होईल. तसेच स्वामीजींच्या हस्ते शिखर कलशावर ८१ कलशांचा ब्रह्मवृद्धांच्या मंत्रघोषाने महाअभिषेक होईल. ९ वाजून ४८ मिनिटे या शुभमुहूर्तावर सपरीवार माऊली परमेश्वरीची पुनःप्रतिष्ठापना, प्राणप्रतिष्ठा, तत्त्वन्यास, महापूजा, बलिदान, महापूर्णाहूती, उत्तरांगविधी, युपस्थापना, देवतांची प्रार्थना, महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद आदी कार्यक्रम होतील.
दुपारी ३ वाजता पाहुणे सुहासिनी महिलांच्या ओट्या भरणे, सायंकाळी ४ वा. गावातील सुवासिनी महिलांच्या ओट्या भरणे, रात्री ८ वा. महिलांची महाआरती, ९ वा. सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी निलेश मेस्त्री व सहकारी यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान समिती, सर्व मानकरी व समस्त निगुडे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.