For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रात्रीचे खेळ बिनधास्त, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

12:24 PM Mar 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
रात्रीचे खेळ बिनधास्त  पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
Advertisement

माशेल, सावईवेरे परिसरात जुगारअड्ड्याना पोलिसांचे अभय, एसबी खात्याकडेही नाही ‘इंटेलिजन्स रिपोर्ट’

Advertisement

फोंडा : म्हार्दोळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सध्या चोर, गुन्हेगारांना मोकळीक मिळाली असून माशेल, सावईवेरे, वाघुर्मे भागात जुगारअड्डे तेजीत असल्याचे चित्र आहे. पोलिस खात्याकडून रात्रीची गस्त सुरु असताना गुन्हेगारी घटना घडत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. माशेल भागात शिमगोत्सवाची धूम असताना जुगारअड्डे जोरात सुरु असल्याची तक्रार म्हार्दोळ पोलिस स्थानकात दाखल करण्यात आलेली आहे. मात्र या तक्रारीला अनुसरून कोणतीच ठोस करावाई म्हार्दोळ पोलिसांनी केलेली नाही. त्यामुळे माशेल भागात सुरु असलेल्या जुगारअड्ड्यांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. खांडोळा येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा शिमगोत्सव सुरु होण्याच्या दिवशी जुगारअड्ड्यांना ऊत येत असतो. ऐन शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीरित्या जुगारअड्डे फोफावू नये यासाठी म्हार्दोळ पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक मधू गावकर यांनी केली आहे. यासंबंधी देवस्थानच्या अध्यक्षाकडे विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

पोलिसांची रात्रीची गस्त कधी होईल परिणामकारण?

Advertisement

म्हार्दोळ स्थानकातर्फे रात्रीच्या गस्तीसाठी बाणस्तारी पुलावर व गावाला जोडणाऱ्या नाक्यावर दोन-चार पोलिस कर्मचाऱ्यांची गस्त ठेवण्यात येते. आऊट पोस्टवरील कार्यरत असलेले पोलिस आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरत आहेत. भाडेकरुंची रितसर माहिती गोळा करण्यात आऊटपोस्ट कर्मचारी कमी पडत असून बेकायदा रेती उपसण्यासाठी असलेल्या कामगारांची आजपर्यंत नेंदीच उपलब्ध होत नाही. भंगारअड्ड्यावर मालाची शहानिशा करण्यात येत नसून, राष्ट्रीय महामार्गावर कामगारांविषयी आवश्यक माहितीही कंत्राटदाराकडून पोलिस प्राप्त करुन घेत नाही त्यामुळे ही मोक्याची ठिकाणे गुन्हेगारांना सुरक्षित ठरत आहेत. कुंडई औद्योगिक वसाहतीत झालेल्या चोरीप्रकरणी छडा लावण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे. मडकई येथील औद्योगिक वसाहतीतील बिगरगेमंतकीय शेड घालून वास्तव्यास आहेत.

फोंडा पोलिस स्थानकाचे एसबी खातेही मूग गिळून गप्प 

संपूर्ण फोंडा तालुक्यासाठी विशेष शाखा असलेल्या (एसबी) शाखाही माशेल, सावईवेरे भागातील बेकायदा जुगारअड्ड्याबाबत कोणतीच इंटेलिजन्स रिपोर्ट उच्चाधिकाऱ्यांना पाठवित नसल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिस म्हणजे चोवीस तास काम असा सर्वत्र समज झालेला आहे. पण त्याचा या शाखेत आल्यानंतर विसर पडतो, शाखेतील विनावर्दीवाले पोलिस केवळ पत्रकारांनी पुरविलेल्या माहितीवर ताव मारुन बिनधास्त पणजी मुख्य कार्यालयात आपण ‘इंटेलिजन्स रिपोर्ट’ पाठविल्याची शेखी मिरवत आहेत. फोंडा तालुक्यातील गुप्तचर एसबी शाखा निष्क्रीय झालेली आहे. एसबी शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे कानाडोळा केलेला असल्यामुळे जुगारअड्डे, बेकायदा रेती व्यवसायावर आळा कोण घालणार हा यक्षप्रश्न माशेल, सावईवेरे भागातील नागरिकांना सतावू लागला आहे.

Advertisement
Tags :

.