नायजेरियाने न्यूझीलंडला केले वर्ल्डकपमधून आऊट
युवा महिला विश्वचषक स्पर्धेत उलटफेर : न्यूझीलंडचा महिला संघ अवघ्या दोन धावांनी पराभूत
वृत्तसंस्था/ कुचिंग, मलेशिया
क्रिकेट जगतात अनेक वेळा चाहत्यांनी मोठे उलथापालथ पाहिले आहे. महिला अंडर-19 विश्वचषकादरम्यान खेळल्या गेलेल्या एका सामन्यादरम्यानही असेच काहीसे घडले आहे. नायजेरियन संघाने न्यूझीलंडच्या महिला संघाला पराभूत केले आहे. हा सामना खूपच रोमांचक झाला. नायजेरियाने हा सामना अवघ्या 2 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, नायजेरियन संघ पहिल्यांदाच अंडर 19 महिला टी 20 विश्वचषक खेळत आहे. ज्यात त्यांनी न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाला पराभूत करण्याची किमया केली आहे. दरम्यान, 25 चेंडूत 19 धावा करणाऱ्या नायजेरियाच्या लकी पीटीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पावसाचा व्यत्यय आलेला हा सामना प्रत्येकी 13 षटकांचा खेळवण्यात आला. प्रारंभी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नायजेरियाकडून कर्णधार लकी पेटीने 22 चेंडूत 18 धावा केल्या तर लिलियन उदेहने 25 चेंडूत 19 धावा केल्या. या दोघींच्या शानदार खेळीच्या जोरावर नायजेरियाने 13 षटकांत 6 गडी गमावून 65 धावा केल्या. इतर नायजेरियन फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड महिलांची सुरुवात खराब झाली. सलामीवीर एम्मा मॅक्लिओड 3 आणि कॅट इर्विन खाते न उघडता बाद झाल्या. यावेळी अवघ्या 7 धावावर किवी संघाने 2 विकेट गमावल्या. येथून इव्ह वोलांडने 14 आणि अनिका टॉडने 19 धावा करत संघाची धावसंख्या 50 च्या जवळ नेली. या दोघी बाद झाल्यानंतर कॅप्टन ताश वेकलिनने 18 धावांचे योगदान दिले. पण तिला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 9 धावांची गरज होती. यावेळी कर्णधार वेकलिन व अयान लांबट मैदानावर होत्या. पहिल्या 4 चेंडूंवर 4 सिंगल धावा आल्या, तर 5 वा चेंडू डॉट होता. आता शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती, लांबटने मोठा फटका खेळला आणि धावा काढण्यासाठी धाव घेतली. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही खेळाडू केवळ 2 धावा करू शकले. न्यूझीलंडचा संघ 6 गडी गमावून केवळ 63 धावा करू शकला व त्यांना अवघ्या दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
संक्षिप्त धावफलक
नायजेरिया 13 षटकांत 6 बाद 65 (उदेह 18, लकी पीटी 19, वेकलिन, फ्रान्सिस, अनिका टॉड, ओ कॉनर प्रत्येकी दोन बळी)
न्यूझीलंड 13 षटकांत 6 बाद 63 (वोलांड 14, अनिका टॉड 19, वेकलिन 18, उदेहृ, उसेन पीस प्रत्येकी एक बळी).
न्यूझीलंड संघ स्पर्धेतूनच आऊट
न्यूझीलंड महिला संघाला पहिल्याच सामन्यात द.आफ्रिकेने पराभूत केले होते. यानंतर आजच्या सामन्यात नायजेरियाकडून हार पत्कारावी लागल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे. प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या नाजेरियन संघाने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवत किवी संघाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.