निफ्टी तेजीत तर सेन्सेक्स अल्पशा घसरणीसह बंद
अमेरिकेतील घसरणीचा परिणाम नाही : रियल्टी कंपन्या तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेतील बाजारात 4 टक्के इतकी जबर घसरण झाल्याचा परिणाम भारतीय बाजारावर मंगळवारी फारसा दिसून आला नाही. निफ्टी 37 अंकांनी वाढत तर सेन्सेक्स काहीसा घसरणीत बंद झाला.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 12 अंकांनी घसरत 74102 अंकांवर बंद झाला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक मात्र 37 अंकांच्या तेजीसमवेत 22497 अंकांवर बंद झालेला दिसला. सकाळी सेन्सेक्स जवळपास 400 अंकांच्या घसरणीसोबत 73,663 च्या स्तरावर पोहचला होता. निफ्टीतही 100 अंकांची घसरण होती. दिवसभरातील व्यवहारावर नजर टाकल्यास रियल्टी क्षेत्रातल्या कंपन्यांची कामगिरी दमदार झाल्याचे दिसले. रियल्टी निर्देशांक 3.63 टक्के वाढत बंद झाला. ऑईल अँड गॅस निर्देशांकही 1.21 टक्क्यांची तेजी राखून होता. धातु निर्देशांक 0.53 टक्के वाढला होता. खासगी बँकांचा निर्देशांक मात्र 1.38 टक्के इतका घसरणीत होता. डेरिव्हेटीव्ह व्यवहारात गडबड केल्याच्या कारणास्तव इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक 27 टक्के इतके घसरले होते.
आशियाई बाजारात पाहता जपानचा निक्केई 0.64 टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.0057 टक्के घसरणीत होता. चीनचा शांघाई कम्पोझीट निर्देशांक मात्र 0.41 टक्के तेजीत होता. 10 मार्च रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी 485.41 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 263.51 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. 10 मार्चला अमेरिकेतील नॅसडॅक 4 टक्के इतका घसरला होता.
हे समभाग तेजीत
बीपीसीएल, सनफार्मा, अदानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया, मारुती सुझुकी, टायटन, आयटीसी, एनटीपीसी, टाटा कन्झ्युमर, नेस्ले इंडिया, ओएनजीसी, ग्रासिम, भारती एअरटेल, श्रीराम फायनान्स, बजाज ऑटो यांचे समभाग तेजीत होते.