निफ्टी निर्देशांक 29 हजाराचा टप्पा ओलांडेल
गोल्डमॅन सॅचने मांडला अंदाज : निफ्टी 14 टक्के वाढण्याचे संकेत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅच यांनी राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टी-50 निर्देशांक येत्या काळामध्ये 29000 चा टप्पा ओलांडू शकेल, असे भाकीत वर्तवले आहे. भारतीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांक 2026 पर्यंत 29000 चे उद्दिष्ट गाठू शकेल असे ब्रोकरेज फर्मने नुकतेच म्हटले आहे. गेल्या काही महिन्यात निफ्टी निर्देशांकाची कामगिरी ही एकंदर जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर दोलायमान राहिली आहे. पण ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅच मात्र निफ्टीच्या पुढील वाटचालीबाबत आशावादी आहे. निफ्टी निर्देशांक शुक्रवारी 25,492 अंकांवर बंद झाल्यानंतर भविष्य वर्तवताना ब्रोकरेज फर्मने निफ्टी आणखी 14 टक्क्यांची वाढ नोंदवणार असल्याचे म्हटले आहे. तेव्हा निफ्टी येत्या काळात 29 हजारपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज आहे.
हे समभाग वधारणार
दुसरीकडे काही कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढीबाबतही अंदाज फर्मने वर्तवला आहे. यामध्ये पीटीसी इंडस्ट्रीज, हिताची एनर्जी इंडिया, सी. ई. इन्फो सिस्टीम्स, टीबीओ टेक, मेक माय ट्रिप, सुवेन फार्मास्युटिकल्स, भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल, युनो मिंडा, डाटा पॅटर्न्स (इंडिया) आणि केईआय इंडस्ट्रीज यांचे समभाग खरेदी करण्याचे मत मांडले आहे. या समभागांमध्ये येणाऱ्या काळात तेजी असू शकते असेही फर्मने म्हटले आहे. अर्थात गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागारांचा वा फंड मॅनेजर यांचा सल्ला घेऊनच निर्णय घेणे योग्य ठरणारे असेल.