निफ्टीची तेजी कायम : सेन्सेक्स काहीसा घसरणीत
बाजाराचा प्रवास संथपणे : गुंतवणूकदार काहीशा सावध भूमिकेत
मुंबई :
चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांच्या कामगिरीत काहीसा बदल दिसून आला. यामध्ये बाजारात संथगती राहिली व मोठमोठे अंदाज मांडण्यात आले होते, ते काहीसे तळ्यातमळ्यात राहिल्याने मंगळवारी गुंतवणूकदार हे सावध भूमिका घेत आपली रणनीती आखताना दिसून आले. कारण अमेरिकन उत्पादन क्षेत्राचा डाटा आणि रोजगारा संदर्भातील येणाऱ्या आकडेवारीची प्रतीक्षा बाजाराने केल्याचे एकंदरीत पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स हा मंगळवारी दिवसअखेर 4.40 अंकांनी प्रभावीत होत 0.01 टक्क्यांसोबत निर्देशांक 82,555.44 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 1.15 अंकांच्या काहीशा तेजीसोबत निर्देशांक 25,279.85 वर बंद झाला आहे. बाजारात निफ्टीने सलग 14 व्या सत्रात आपली तेजीची घोडदौड कायम ठेवली आहे.
मंगळवारच्या सत्रात निफ्टी 50 मधील 21 समभाग हे वधारुन बंद झाले. यामध्ये स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लाईफ आणि हिरोमोटो कॉर्प यांचे समभाग हे 1.72 टक्क्यांनी वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, ओएनजीसी, इन्फोसिस, अदानी पोर्ट आणि एचसीएल टेक यांचे समभाग हे 1.36 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहे.
बीएसई सेन्सेक्समध्ये 30 मधील 12 समभाग हे वधारले आहेत. यात आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, टायटन, एचडीएफसी बँक आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग वधारले आहेत. तसेच बजाज फायनान्स, इन्फोसिस, अदानी पोर्टस, जेएसडब्ल्यू स्टील आणि एचसीएल टेक यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले.बाजारातील व्यापकतेनुसार बाजारातील निर्देशांकांची कामगिरी चांगली राहिली. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.54 टक्क्यांनी वधारला आहे. तर मिडकॅप 0.19 टक्क्यांनी वधारला.कंझ्युमर ड्युरेबल्सचा निर्देशांक सर्वाधिक तेजीत राहिला.