लंकेच्या प्रशिक्षण चमूत नीकर्क, ग्रेगरी यांचा समावेश
वृत्तसंस्था, कोलंबो
लंकन क्रिकेट संघाचा दर्जा झपाट्याने सुधारण्यासाठी लंकन क्रिकेट मंडळाने प्रशिक्षक वर्ग अधिक भक्कम करण्यावर भर दिला आहे. आता लंकन क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक वर्गामध्ये रायन व्हॅन नीकर्क तसेच जॉर्डन ग्रेगरी यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
2023 ते 2026 या कालावधीत नेदरलँड्स क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्याकरीता राष्ट्रीय गोलंदाज प्रशिक्षक रियान व्हॅन नीकर्क यांचे योगदान महत्त्वाचे ठरले होते. आता नीकर्क हे लंकन संघाला गोलंदाजीचे मार्गदर्शन यापुढे करणार आहेत. 2023 च्या आयसीसी पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याचप्रमाणे आयसीसीच्या विविध टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड्स संघाचा सहभाग झाला होता. नेदरलँड्स क्रिकेट संघाला दर्जेदार करण्यासाठी नीकर्क यांचा प्रयत्न निश्चितच यशस्वी झाला होता. आता लंकन क्रिकेट मंडळाबरोबर नीकर्क यांनी दोन वर्षांचा करार केला आहे. 15 एप्रिलपासून या कराराची अंमलबजावणी सुरु होणार असून नीकर्क लंकन संघाचे गोलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहतील.
क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या हेतूने लंकन क्रिकेट मंडळाने जॉर्डन ग्रेगरी यांची क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून त्याचप्रमाणे फिरकी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेगरी यांच्या बरोबर लंकन क्रिकेट मंडळाने दोन वर्षांचा करार केला असून ते 15 एप्रिलपासून ही नवी सूत्रे हाती घेतील. नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या टी-20 पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत लंकन संघाला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती.