सुहास शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे
सुहासच्या हत्येचा कट शिजला होता तीन महिने आधीच
बेंगळूर : मंगळूर शहरातील बाजपेजवळ हिंदू कार्यकर्ता सुहास शेट्टी याची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास दलाकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे. राज्य भाजप नेत्यांसह हिंदुत्ववादी संघटनांनी दबाव आणल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने हे प्रकरण एनआयएकडे सोपविले आहे. हिंदू कार्यकर्ता सुहास शेट्टी याच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याची विनंती भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली होती. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधानपरिषद विरोधी नेते चलवादी नारायणस्वामी आणि मंगळूर, उडुपी जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना चार पानी लेखी निवेदन दिले होते.
सुहास शेट्टीच्या कुटुंबीयांनीही सरकारकडे आपल्या मुलाच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्याची मागणी केली होती. 1 मे रोजी रात्री मंगळूर शहरातील बाजपे येथे भररस्त्यात सुहास शेट्टी यांची तलवारी, कोयत्यांनी वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गतिमान करत पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी शोध जारी आहे. सुहासच्या हत्येचा कट तीन महिने आधीच शिजला होता. जानेवारीत आरोपी सफवान याच्या टोळीला आदील याने सुहासला संपविण्यासाठी 3 लाखांची सुपारी दिली होती. हिंदू कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू याच्या हत्येचा बदला म्हणून फाजील या युवकाची हत्या झाली होती. फाजीलच्या हत्या प्रकरणात सुहास शेट्टी हा आरोपी होता. त्याला संपविण्यासाठी फाजीलचा भाऊ आदील याने सफवान टोळीला सुपारी दिली होती.