पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडे
पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संकेत
वृत्तसंस्था/ श्रीनगर
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविला आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मुखवटा संघटना ‘द रेसिस्टेंस फ्रंट’ने या हल्ला घडवून आणला होता. पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए करणार असल्याचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केला आहे.
अधिकाऱ्यांनुसार एनआयए आता जम्मू-काश्मीर पोलिसांकडून हे प्रकरण स्वत:च्या हातात घेण्याच्या प्रक्रियेत आहे. एनआयए या हल्ल्याशी निगडित व्यापक दहशतवादी जाळे आणि कटाचा पर्दाफाश करण्यासाठी लवकरच सखोल तपास सुरू करणार असल्याचे मानले जात आहे.
एनआयए आता जम्मू-काश्मीर पोलिसांकडून नोंद एफआयआरला पुन्हा नोंद करत औपचारिक तपास सुरू करणार आहे, परंतु महासंचालक विजय साखरे यांच्या नेतृत्वात एनआयएचे पथक यापूर्वीच म्हणजेच 23 एप्रिलपासूनच स्थानिक पोलिसांना मदत करत आहे.
पीडितांचे जबाब
एनआयए मागील काही दिवसांपासून हल्ल्यात बचावलेल्या लोकांचे जबाब नोंदवून घेत आहे. तसेच लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अन्य दहशतवादी संघटनांशी निगडित अटक केलेले दहशतवादी आणि ओव्हरग्राउंड वर्कर्सची चौकशी करत आहे. याचदरम्यान सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे संयुक्त पथक बैसरन खोऱ्यात 26 निर्दोष पर्यटकांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
पाकिस्तानचा हात
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्याचे डिजिटल पुरावे पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद तसेच पाकिस्तानच्या कराची येथील सुरक्षित ठिकाणांपर्यंत ट्रेस केले आहेत. यातून या हल्ल्यात पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याची पुष्टी मिळाली आहे. हा हल्ला देखील मुंबईवरील 26/11 हल्ल्याप्रमाणेच कंट्रोल-रुम ऑपरेशनच्या धर्तीवर घडवून आणला असल्याचे मानले जात आहे.
डिजिटल फुटप्रिंट
पहलगाम येथील हल्ल्यात 4-5 दहशतवादी सामील होते, जे अत्याधुनिक शस्त्रांनी युक्त होते अणि काही दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या गणवेशासारखे कपडे परिधान केले होते असे फॉरेन्सिक विश्लेषण आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यात पाकिस्तान स्थित दहशतवादी सक्रीय स्वरुपात सामील होते. डिजिटल फुटप्रिंट थेट मुजफ्फराबाद आणि कराचीच्या दहशतवादी ठिकाणांशी जोडले गेले आहेत, जेथे यापूर्वीही लष्कर-ए-तोयबाच्या मोठ्या हल्ल्यांचे कट रचण्यात आले होते अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
पूर्ण परिसरात बारकाईने तपास
एनआयएचे पथक घटनास्थळी पोहोचून तपास करत आहे. एक पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांची टीम या तपासाचे नेतृत्व करत असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एनआयएचे पथक दहशतवाद्यांविषयी माहिती मिळविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. दहशतवादी कुठल्या मार्गाने आले आणि निघून गेले हे देखील तपासले जात आहे. एनआयएचे पथक फॉरेन्सिक आणि अन्य तज्ञांची मदत घेत आहे. पूर्ण परिसरात अत्यंत बारकाईने तपास केला जात आहे. या हल्ल्यासंबंधीचे पुरावे मिळविण्याचा प्रयत्न एनआयएकडून सुरू आहे.