बिहारसह 3 राज्यात एनआयएचे छापे
चौघांना अटक : अवैध शस्त्रतस्करी प्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ पाटणा
एनआयएने बेकायदेशीर शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा तस्करी प्रकरणी धाडसत्र सुरूच ठेवले आहे. बिहारमधील पाटणा, नालंदा आणि शेखपुरा तसेच हरियाणा व उत्तर प्रदेशमधील सात ठिकाणी छापे टाकून चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाटणा येथील शशी कुमार आणि शेखपुरा येथील रविरंजन यांचा समावेश आहे. या कारवाईच्या माध्यमातून एनआयएने बेकायदेशीर शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा तस्करीत सहभागी असलेल्या आंतरराज्यीय नेटवर्कविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.
एनआयएने बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील वेगवेगळ्या 22 ठिकाणी छापे टाकत चार जणांना अटक केली. हरियाणामध्ये विजय कालरा आणि कुश कालरा (दोघेही राहणार कुरुक्षेत्र) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रs आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. त्याशिवाय 1 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम, अनेक डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संशयास्पद ओळखपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
दिल्ली स्फोटाचे संशयित दुवे
एनआयएच्या सूत्रांनुसार, या नेटवर्कने हरियाणाहून शस्त्रs आणली आणि उत्तर प्रदेशमार्गे बिहार आणि देशाच्या इतर भागात ती पुरविण्यात आली. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातही ही टोळी सहभागी असू शकते असा तपास यंत्रणेला संशय आहे. या संभाव्य दुव्याची सखोल चौकशी केली जात असून दोन्ही प्रकरणे समांतरपणे जोडली जात आहेत. पाटणा विभागीय कार्यालयाने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी सकाळी एनआयएच्या 22 पथकांनी एकाचवेळी सर्व ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.