For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक, केरळम, तामिळनाडूत एनआयएचे 19 ठिकाणी छापे

06:38 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक  केरळम  तामिळनाडूत एनआयएचे 19 ठिकाणी छापे
Advertisement

अवैध स्फोटक जप्तीप्रकरणी कारवाई : पुरवठा साखळीचा शोध

Advertisement

वृत्तसंस्था/ मलप्पुरम, बेंगळूर

केरळमच्या मलप्पुरम जिह्यात अवैध स्फोटके जप्त केल्याप्रकरणी झालेल्या तपासाचा भाग म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी केरळम, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये एकाच वेळी 19 ठिकाणी छापे टाकले. एनआयएकडून स्फोटकांचा स्रोत, पुरवठा साखळी आणि त्यात सामील असलेल्या संभाव्य नेटवर्कचा तपास सुरू आहे.

Advertisement

एनआयएने तपास सुरू केलेल्या या प्रकरणाचे मूळ केरळममधील मलप्पुरमशी संबंधित आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी, चेम्माड (मलप्पुरम) येथे कांदे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकमधून पोलिसांनी 448 खोक्यांमध्ये लपवलेल्या 89,600 जिलेटीनच्या कांड्या आणि 10,500 डिटोनेटर्स जप्त केले होते. या जप्तीनंतर, सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य गैरवापर आणि सुरक्षेच्या धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

विजापूर कनेक्शन उघड

स्फोटके प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच सहा जणांना अटक केली आहे. ही स्फोटके अवैध खाणकामात वापरण्यासाठी होती, परंतु जप्त केलेल्या मोठ्या प्रमाणामुळे एनआयएने सखोल तपास करण्याचा निर्णय घेतला. ही स्फोटके कर्नाटकातील विजापूर येथून आणण्यात आली होती. एनआयएने या वर्षाच्या सुरुवातीला केरळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास हाती घेतला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, एजन्सीने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. गेल्या काही महिन्यात एनआयएने आंतरराज्यीय अवैध शस्त्रs आणि स्फोटकांच्या नेटवर्कवरील आपली कारवाई तीव्र केली आहे.

बहुराज्यीय नेटवर्कचा संशय

जप्त केलेल्या सामग्रीच्या खरेदी आणि वितरणात सामील असलेल्या काही व्यक्तींचे अनेक राज्यांशी संबंध असू शकतात. यामुळेच शनिवारी सकाळपासून अनेक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. ही स्फोटके कशी मिळवली, साठवली आणि वाहून नेली गेली, हे तपास अधिकारी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ही सामग्री कोणत्याही अवैध कामात किंवा अवैध व्यापारात वापरण्यासाठी होती का, याचाही तपास एजन्सी करत आहे. ही स्फोटके दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये पसरलेल्या नेटवर्कद्वारे मिळवून विविध ठिकाणी पोहोचवल्यानंतर एनआयएने आपल्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे. छाप्यांदरम्यान अधिकाऱ्यांनी संशयितांशी संबंधित निवासी आणि व्यावसायिक जागांची झडती घेतली. संपूर्ण नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.