एनआयएचे कर्नाटकसह नऊ राज्यांमध्ये 20 छापे
दिल्लीतील ‘ऑनलाईन रॅडिकॅलिझमचे’ प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रसार माध्यमांचा दुरुपयोग करून विशिष्ट धर्माच्या युवकांना अतिरेकी बनविण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने (एनआयए) 9 राज्यांमधील 20 स्थानांवर धाडी टाकून पुरावा मिळविल्याची माहिती देण्यात आली आहे. युवकांशी ऑनलाईन संपर्क करून त्यांच्या मनात इस्लामिक स्टेटची अतिरेकी आणि फुटीरतावादी विचारसरणी रुजविण्याच्या कारस्थानाचा एनआयएकडूक शोध घेतला जात आहे. यासंदर्भात या धाडी आहेत, असे प्रतिपादन एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली अशा 9 राज्यांमध्ये बुधवारी साधारणत: एकाच वेळी या धाडी घालण्यात आल्या. या धाडींमध्ये अनेक डिजिटल साधने हस्तगत करण्यात आली असून ती गुन्हा विज्ञान विभागाच्या प्रयोगशाळांमध्ये परीक्षणासाठी पाठविली जाणार आहेत. आतापर्यंत या प्रकरणात 11 जणांना अटक झालेली आहे.
विजयवाडा येथे प्रारंभ
हे ऑनलाईन कारस्थान आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे यावर्षीच्या मे महिन्यात प्रथम उजेडात आले होते. त्यानंतर त्याचा तपास एनआयएने आपल्या हाती घेतला आहे. मार्च 2026 मध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनी रहमतुल्ला शरीफ मोहम्मद नामक संशयिताच्या घरावर धाड टाकली होती. ‘एक्यूआयएस’ आणि ‘आयएसआयएस’ या बंदी घालण्यात आलेल्या इस्लामी दहशतवादी संघटनांची जहाल धार्मिक विचारसरणी असणारे साहित्य या संशयिताच्या घरी आढळले होते.
गोपनीय माहिती मिळाल्यावरून धाडी
आंध्र प्रदेश पोलिसांनी जप्त केलेल्या सामग्रीचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर या कारस्थानाची व्याप्ती एनआयएच्या ध्यानात आली आहे. भारताच्या अनेक राज्यांमध्ये या कारस्थानाला आकार देण्यात येत असल्याची माहिती या सामग्रीवरून मिळाली. त्या आधारावर बुधवारच्या या धाडी घालण्यात आल्या, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली. या प्रकरणाचा तपास त्याच्या मुळापर्यंत जाऊन करण्यात येईल, असे प्रतिपादन एनआयएकडून करण्यात आले.
बॉक्स
हिंसक जिहादी विचारसरणी
भारतातील विशिष्ट धर्माच्या युवकांमध्ये हिंसक जिहादी विचारसरणी पसरवून त्यांना अतिरेकी बनविण्याचे हे कारस्थान आहे. यासाठी युवकांना हेरले जाते आणि त्यांच्याशी ऑनलाईन संपर्क केला जातो. त्यांच्या मनात भारताच्या विरोधात द्वेष निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रचार केला जातो. अशाप्रकारे या युवकांना आपल्या कुप्रभावाखाली आणून नंतर त्यांना दहशतवादी कृत्ये करण्यास उद्युक्त केले जाते, असे या कारस्थानी कारवायांचे स्वरुप आहे. तथापि, ते वेळीच उघडकीस आल्याने एनआयएकडून ते हाणून पाडण्याचा निर्धार केला गेला आहे.