आधी रस्त्याची दुरुस्ती करा ,मगच जि. प. कडे हस्तांतरण करा
न्हावेली उपसरपंचांचा कडक पवित्रा
न्हावेली /वार्ताहर
न्हावेली मुख्य रस्ता ते माऊली मंदिर या जोड रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ग्रामस्थांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर जोपर्यंत रस्त्याची सर्व कामे आणि दुरुस्ती पूर्ण होत नाही,तोपर्यंत हा रस्ता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करु नये,अशी ठाम भूमिका न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी घेतली आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे.तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.या संदर्भात अक्षय पार्सेकर यांनी कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.कंत्राटदाराची देखभाल दुरुस्तीची मुदत ३१ मे २०२६ पर्यत असून त्याआधी सर्व त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जर खराब अवस्थेत रस्ता जिल्हा परिषदेकडे वर्ग झाला,तर भविष्यात दुरुस्तीचा नाहक भार ग्रामपंचायतीवर येईल,अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.या मागणीची दखल घेत कार्यकारी अभियंत्यांनी सर्व अपूर्ण कामे पूर्ण केल्याशिवाय रस्ता हस्तांतरित केला जाणार नाही,असे आश्वासन दिले आहे.यावेळी उपसरपंच अक्षय पार्सेकर,प्रशांत साटेलकर,ओम पार्सेकर,राज धवन,अमोल पार्सेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.