For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

न्हावेलीत ओंकार हत्तीचा धुडगूस; नाचणी, भातशेतीसह मालमत्तेचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल; सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांची भेट

03:06 PM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्हावेलीत ओंकार हत्तीचा धुडगूस  नाचणी  भातशेतीसह मालमत्तेचे मोठे नुकसान  शेतकरी हवालदिल  सहाय्यक वनसंरक्षक व्ही  एस  बोराटे यांची भेट
Advertisement
न्हावेली / वार्ताहर : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ओंकार हत्तीचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी हत्ती शेतात घुसून नाचणी आणि भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. याशिवाय माड बागायती, शेतीपंप, पाण्याच्या टाक्या आणि दुचाकी वाहनांचेही नुकसान होत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

या गंभीर समस्येकडे वनविभागाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. हत्तीच्या वाढत्या वावरामुळे शेतीचे नुकसान होत असून, ग्रामस्थांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

Advertisement

हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी सुतळी बॉम्बचा वापर करून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अशा उपायांमुळे हत्ती अधिक आक्रमक होण्याची शक्यता असून, परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे हत्तीला चिथावणी मिळेल अशा उपाययोजना थांबवून ग्रामस्थ आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या!

Advertisement

हत्तीमुळे नुकसान झालेल्या नाचणी व भातशेतीचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतीपंप, पाण्याच्या टाक्या आणि दुचाकी वाहनांच्या नुकसानीचीही दखल घेऊन संबंधितांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, असे निवेदन सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. बोराटे यांच्याकडे करण्यात आले.

वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सुरक्षित उपाययोजना कराव्यात आणि नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यावेळी न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर, निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, राज धवन, दीपक पार्सेकर, वैभव चौकेकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.