पुढील वर्षी आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धा भारतात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2027 मध्ये नवी दिल्लीत होणाऱ्या आशियाई रायफल-पिस्तुल नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित आहे. 2028 च्या लॉस एन्जिल्स ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दिल्लीतील ही स्पर्धा पात्रतेची राहील. सदर माहिती अखिल भारतीय रायफल संघटनेच्या प्रवक्त्याने दिली आहे.
नवी दिल्लीतील डॉ. कर्निसिंग नेमबाजी संकुलात सदर आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धा 1 ते 10 डिसेंबर 2027 मध्ये होणार आहे. या स्पर्धेतून अव्वल नेमबाजांना 2028 च्या लॉस एन्जिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळविण्याची संधी राहील. या आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 2028 ची स्पर्धा ही भारतातील ही दुसरी पात्रतेची स्पर्धा राहील. 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेची खिडकी 31 जुलै 2026 पासून सुरू होणार असून ती 1 मे 2028 ला बंद केली जाईल. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 21 नेमबाजांनी आपला सहभाग दर्शविताना तीन पदके मिळविली. मनू भाकरने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल आणि मिश्र सांघिक प्रकारात दोन कांस्यपदके तर स्वप्नील कुसाळेने पुरूषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन प्रकारात कांस्यपदक घेतले होते.