पुढचे पाऊल...
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका सुरू आहे. यातील चौथ्या मेलबर्न कसोटीत टीम इंडियाला धक्कादायक पराभव स्वीकाराला लागल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन महान खेळाडूंच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. मागच्या काही दिवसांपासून हे दोघेही अतिशय खराब फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे नव्या वर्षामध्ये भारताची ही जोडी क्रिकेटला गुडबाय करण्याची शक्यता वर्तविली जाते. भारतीय क्रिकेटचे हिरो म्हणून गुंडाप्पा विश्वनाथ, कपिल देव, सुनील गावस्कर, मोहिंदर अमरनाथ, सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य क्रिकेटपटूंची नावे आपण सातत्याने घेत असतो. या यादीतली वर्तमान नावे म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली. कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही स्तरावर रोहितने मागच्या काही वर्षांत जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या योगदानाने भारताला नव्या उंचीवर नेले. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपद, तर टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावण्यात त्याच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा रोल राहिला. तथापि, मागच्या काही दिवसांपासून रोहितचा सूर हरवल्याचे दिसून येते. कसोटी क्रिकेटमध्ये तर तो अगदी बॅडपॅचमधून जात असल्याचे पहायला मिळते. मागच्या दहा डावातला त्याचा सर्वोच्च स्कोर केवळ 18 इतका राहिला आहे. 3, 9, 10, 3, 6, 18 11, 0, 8, 2 या त्याच्या दहा डावातल्या धावाच त्याच्या परफॉर्मन्सबद्दल काय ते सांगतात. त्यामुळे रोहितने निवृत्ती घ्यावी, असा सल्ला त्याला दिला जात आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू व कोच रवी शास्त्री यांनीही रोहितने लवकरात लवकर भविष्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना केली आहे. हे पाहता रोहितकडून लवकरच निवृत्तीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताची रनमशीन ही विराट कोहलीची ओळख. पण, मागच्या काही दिवसांपासून धावांसाठी त्याला झगडावे लागत आहे. विराटचे तंत्र तसे तिन्ही फॉरमॅटला साजेसे. तो जितक्या सहजतेनं वन डे किंवा टी ट्वेंटी खेळतो. तितक्याच सहजपणे कसोटीमध्ये त्याची बॅट चालते. पदलालित्य, तंत्रशुद्धता, शैली अशा तिन्ही पातळ्यांवर त्याला तोड नाही. परंतु, मागच्या दहा डावात एका शतकाचा अपवाद वगळता विराटला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. एका शतकासह 36, 5, 3, 7, 11, 5, 4, 1, 1 अशी सर्वसाधारण त्याची कामगिरी राहिली आहे. त्यामुळे विराटनेही कसोटीमध्ये आता थांबले पाहिजे, असा सूर व्यक्त होताना दिसतो. रोहित आणि विराटने भारतीय क्रिकेटसाठी आजवर मोठे योगदान दिले. गरजेच्या वेळेस संघासाठी त्यांनी धावांचे डोंगर उभे केले. मात्र, दोघांमध्येही आता कसोटी क्रिकेटसाठी लागणारी ती तडफ दिसत नाही. रोहित शर्मा आजमितीला 37 वर्षांचा आहे. वाढत्या वयाचा त्याच्या खेळावर परिणाम झालेला दिसतो. तसा सुऊवातीपासून वन डे स्पेशालिस्ट म्हणून तो ओळखला जातो. कसोटीमध्ये आणखी फार दिवस खेळण्याची त्याचीही इच्छा दिसत नाही. हे बघता पुढच्या काही दिवसांत त्याने कसोटीला रामराम ठोकल्यास आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. आता विराटही 36 वर्षांचा आहे. वयाचा विचार करता कसोटीला रामराम ठोकून त्याने वनडेवर लक्ष्य केंद्रित करावे, असे मागच्या काही दिवसांपासून त्याला सुचविण्यात येत आहे. सर्व फॉरमॅटमध्ये मिळून त्याच्या नावावर 81 शतके आहेत. शतकांचे शतक करण्यासाठी योग्य विश्रांती आणि एका फॉरमॅटवर लक्ष्य केंद्रित करणे महत्त्वाचे असेल. हे पाहता विराटही या वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात कसोटीतून निवृत्ती घोषित करू शकतो, असे क्रिकेटतज्ञांचे म्हणणे आहे. खरेतर भारतीय क्रिकेटच्या अवकाशात रोहित आणि विराट हे दोन तारे आजवर कायम चमकत राहिले आहेत. आता त्यांची कारकीर्द मावळतीकडे झुकल्याचे दिसते. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार, याविषयीही चर्चा सुरू झालेल्या दिसतात. यात सर्वात आघाडीवर नाव दिसतं ते यशस्वी जैस्वाल याचे. यशस्वीची आतापर्यंतची कारकीर्द चांगलीच यशस्वी ठरली आहे. कसोटीत 18 सामन्यात या 23 वर्षांच्या युवा फलंदाजाने 55 च्या सरासरीने 1766 धावा कुटल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्यानं खोऱ्यानं धावा ओढल्या. 161, 82, 84 अशा मोठ्या धावसंख्या त्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर केल्या, हे विसरून चालणार नाही. रोहितला पर्याय ठरण्याची त्याच्यात नक्कीच क्षमता आहे. शुभमन गीलबाबतही तसेच म्हणता येईल. अलीकडे त्याचा फॉर्म ढासळलाय, हे खरेच. पण, त्याचे कौशल्य बघता तो कमबॅक करू शकतो. वन डेतील त्याची सरासरी 58 इतकी असून, त्याने 47 सामन्यात 2328 धावा केल्या आहेत. तर कसोटीत 31 सामन्यात 35 च्या सरासरीनं 1860 धावा नोंदवल्या आहेत. आक्रमकता आणि क्लास ही या दोन्ही खेळाडूंची वैशिष्ट्या मानली जातात. त्यामुळे शुभमनकडून आशा असतील. या दोघांशिवाय महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याच्याकडेही या खेळाडूंची जागा घेण्याची क्षमता दिसून येते. ऑस्ट्रेलिया कसोटीत नितीशकुमार रे•ाrसारखा अष्टपैलू खेळाडू आपल्याला गवसला, हे आश्वासकच ठरावे. रोहित आणि विराटची निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, हे सत्यही आपण स्वीकारले पाहिजे. त्यादृष्टीने भविष्यातल्या टीम इंडियासाठी आत्तापासूनच पायाभरणी करणे क्रमप्राप्त ठरते. वास्तविक, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताला ही मालिका जिंकणे अनिवार्य होते. मात्र, या पाच सामन्यांच्या कसोटीत भारत 2 विऊद्ध 1 ने पिछाडीवर असल्याचे दिसते. हा प्रवास खडतर असला, तरी संघाच्या नव्या बांधणीसाठी पुढचे पाऊल टाकावेच लागेल.