News Paper Vendor Kolhapur: 13 व्या वर्षी सुरु केलेला प्रवास 79 व्या वर्षीही कायम, तीन पिढ्यांचा व्यवसाय
केवळ व्यवसाय नाही, तर तीन पिढ्यांचा वारसा असल्याचे ते अभिमानाने सांगतात
By : दिव्या कांबळे, साजिद पिरजादे
कोल्हापूर : वयाने वृद्ध आहे, पण मनाने तरुण आहे, हे सिद्ध करत 79 व्या वर्षी वाचकांना घरोघरी वृत्तपत्र पोहोच करणाऱ्या अरविंद लुकतुकेंचा प्रवास प्रेरणादायी आहे. ते आजही रोज पहाटे साडेचारला उठून वृत्तपत्र विक्रीसाठी रस्त्यावर असतात. हा केवळ व्यवसाय नाही, तर तीन पिढ्यांचा वारसा असल्याचे ते अभिमानाने सांगतात.
वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी कामाची सुरुवात केली. 1908 साली त्यांचे आजोबा कोल्हापुरात टाईम्स ऑफ इंडियाच्या एजन्सीमध्ये कार्यरत होते. त्या काळी मराठी वृत्तपत्रे अस्तित्वात नव्हती. आजोबांनंतर वडिलांनी, आणि पुढे लुकतुके यांनी हा व्यवसाय पुढे नेला. त्यांनी बाहेरुन बी. कॉम. पूर्ण केले, पण वृत्तपत्र विक्री कधी थांबवली नाही.
प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणारे अवलिया
पूर्वी मुंबई, पुणे येथून वृत्तपत्र आणणे ही मोठी धावपळ असे. सकाळी स्थानिक वृत्तपत्र, 9 वाजता पुण्याचे, तर दुपारी मुंबईचे वृत्तपत्र. यात दिवसाचे 12-13 तास सलग काम करावे लागत असे. पूर्वी उशिरा आलेल्या वर्तमानपत्रासाठी रात्रभर वाट पहावी लागे.
वयोमानाचा लंबक जरी सूर्यास्ताकडे झुकला असला तरी आजही वाचकांच्या घरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा त्यांचा शिरस्ता चुकला नाही. वृद्धापकाळात आधारासाठी हातात काठी न घेता वर्तमानपत्र घेऊन वाचकांपर्यंत माहितीची गंगा पोहोच करण्याचा त्यांचा उत्साह, तरुणाईला लाजवेल असाच आहे.
पोषाख अन शिस्तबद्धता
भल्या पहाटे स्वत:ची साखर झोप मोडून वाचकांपर्यंत नित्यनियमाने या वयात वर्तमानपत्र पोहोच करून थेट कृतीतूनच स्वावलंबी जीवनाचा धडा गिरवत आहेत. आजही ते राजारामपुरीतील वर्तमानपत्रांच्या विक्री केंद्रावर स्वच्छ पेहराव आणि इनशर्ट करुनच येतात. ऊन, वारा, पाऊस, महापूर, कोरोना यासांरख्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी आपली शिस्त अन् काम नेटाने सुरु ठेवले.
उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली
या व्यवसायामुळे काही किलोमीटर दररोज चालणे होते. व्यायाम तर होतोच शिवाय जनमाणसाशी संवाद होतो. त्यामुळे आजही मी शारीरिक, मानसिकरित्या तंदुरुस्त आहे, असे लुकतुके अभिमानाने सांगतात. तसेच पूर्वी वर्तमानपत्रांची छपाई कधी झाली, कधी येणार आहे, कुठे आले हे कळत नव्हते.
अंदाज लावून वर्तमानपत्राची प्रतीक्षा करावी लागत होती. पण आता मोबाईलमुळे वर्तमानपत्र कुठे आले तेही समजते. तसेच रस्ते, वाहतूक व्यवस्थेत खूप सुधारणा झाल्याने वाचकांच्या हातात वेळेत वर्तमानपत्र मिळते. याचेही समाधान असल्याचे लुकतुके यांनी सांगितले.
तीन पिढ्यांच्या व्यवसाय असल्यामुळे अडचण नाही
"लुकतुके कुटुंबात आमच्या आजोबापासून वर्तमानपत्र वितरणाचे काम सुरु झाले. आजोबानंतर वडिलांनी हे काम केले. आता मी वर्तमानपत्र पोहोच करत आहे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून देशोदेशातील माहिती वाचकापर्यंत पोहोचवल्याचे समाधान या कामातून मिळते."
- अरविंद लुकतुके, वृत्तपत्र विक्रते, कोल्हापूर शहर