For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृत्तपत्र वितरक परिषद 11 नोव्हेंबर रोजी

06:20 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
वृत्तपत्र वितरक परिषद 11 नोव्हेंबर रोजी
Advertisement

राज्यभरातील वृत्तपत्र वितरक राहणार उपस्थित

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक राज्य वृत्तपत्र वितरक संघटना आणि बेळगाव जिल्हा वृत्तपत्र वितरक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 नोव्हेंबर रोजी सहाव्या राज्य वृत्तपत्र वितरक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील धर्मनाथ भवन येथे हा कार्यक्रम होणार असून यावेळी एक हजाराहून अधिक राज्यभरातील वृत्तपत्र वितरक उपस्थित राहणार आहेत. विविध जिल्ह्यांमधील वृत्तपत्र वितरकांना एकाच व्यासपीठावर आणले जाणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत कुमार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

वृत्तपत्र वितरकांच्या कल्याणासाठी आवश्यक सुविधा पुरवाव्यात, 2018 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्र वितरकांसाठी 12 कोटी रुपयांच्या कल्याण निधीची घोषणा केली होती. परंतु हा निधी आजतागायत वितरकांपर्यंत पोहोचलेला नाही. वृत्तपत्र वितरकांसाठी 10 कोटी रुपये कल्याण निधी देण्यासोबतच वितरक व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची मागणी केली जाणार आहे.

याबरोबरच वृत्तपत्र वितरकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला तात्काळ  नुकसानभरपाई मिळावी, वैद्यकीय उपचारासाठी किमान 25 लाखांची मदत, वृत्तपत्र वितरकांसाठी निवासाची व्यवस्था, मुलांच्या शिक्षणासाठी मदत, उच्चशिक्षणासाठी कर्जसुविधा, इलेक्ट्रीक वाहन खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज यासह इतर मागण्या या परिषदेतून राज्य सरकारकडे केल्या जाणार आहेत. तसेच बेळगाव जिल्ह्यातील 16 तालुक्यांमधील वृत्तपत्र विक्रेत्यांचा वृत्तपत्र वितरक सेवारत्न म्हणून सन्मानित केले जाणार आहे. पाच ज्येष्ठ आणि दोन वृत्तपत्र वितरकांच्या मुलांसह ज्येष्ठ वितरकांचाही सन्मान केला जाणार आहे.

या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी माध्यम समूहांसह नागरिकांनीही उपस्थित रहावे असे आवाहन बेळगाव जिल्हाध्यक्ष दीपक राजगोळकर यांनी केले. कार्याध्यक्ष प्रताप भोसले, उपाध्यक्ष श्रीकांत नेवगी, सचिव राजू भोसले, नागराज कुलकर्णी, सतीश नाईक, भाऊ पवार, संजय कदम उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.