For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आयपीएल’मध्ये संधीसाठी धडपडणारे नवोदित...

06:01 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘आयपीएल’मध्ये संधीसाठी धडपडणारे नवोदित
Advertisement

गेल्या वर्षीच्या आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशी व आयुष म्हात्रे यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यातील वैभवनं मागच्या पानावरून चालू अशा छापाची कामगिरी किमान पहिल्या सामन्यात तरी करून दाखवलीय...यंदाच्या हंगामातही या स्पर्धेची ‘जिथे प्रतिभेला मिळते संधी’ ही ‘टॅगलाईन’ सार्थ ठरविणारे अनेक खेळाडू पाहायला मिळतील. पुढील आठ आठवड्यांत आपल्या कामगिरीनं नाव कमावण्याची अपेक्षा असलेल्या अन् संधी मिळण्यासाठी धडपडणाऱ्या काही नवोदित चेहऱ्यांचा हा आढावा...

Advertisement

? प्रशांत वीर (चेन्नई सुपर किंग्स) : भारतात असे अनेक क्रिकेटपटू आहेत जे  डावखुरी फिरकी गोलंदाजी करतात आणि डाव्या हाताने फलंदाजी करतात. परंतु मूळ अमेठीच्या 20 वर्षीय प्रशांत वीरसमोर आव्हान आहे ते रवींद्र जडेजासारख्या दिग्गज खेळाडूची जागा भरून काढण्याचे...चेन्नई सुपर किंग्सनं युवा खेळाडूंवर इतकी मोठी गुंतवणूक केल्याचं यापूर्वी कधीही पाहायला मिळालेलं नाही. त्यांनी प्रशांतसाठी चक्क 14.20 कोटी ऊपयांची बोली लावून त्याचा समावेश केलाय. त्याच्या नावावर जमा आहेत ते सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेचे केवळ नऊ सामने. तरीही गोलंदाजीतील 6.45 च्या इकोनॉमी रेटसह आणि फलंदाजीतील 167 हून अधिक स्ट्राईक रेटसह प्रशांत वीर या हंगामात चेन्नईसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा...

? तेजस्वी दहिया (कोलकाता नाईट रायडर्स) : कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा शिष्य असलेला अंगक्रिश रघुवंशी याला ’फलंदाज-यष्टीरक्षक म्हणून तयार केलं जातंय. कारण तो यापूर्वी ‘आयपीएल’चे काही हंगाम खेळलाय. परंतु दिल्लीचा रहिवासी असलेला 23 वर्षीय दहिया हा देखील एक अत्यंत गुणवान खेळाडू. जर त्याला सातत्यानं संधी दिली गेली, तर तो संघाला उत्तम पद्धतीनं हातभार लावू शकतो. गेल्या ‘सय्यद मुश्ताक अली चषक’ स्पर्धेदरम्यान त्यानं दिल्ली संघासाठी अर्धशतक झळकावलं होतं. तसंच त्याचा 168 चा स्ट्राईक रेट पाहता मधल्या फळीसाठी तो एक उत्तम पर्याय ठरेल...

Advertisement

? नमन तिवारी (लखनौ सुपर जायंट्स) : भारतात डावखुरे वेगवान गोलंदाज फारच दुर्मिळ...अशा परिस्थितीत 2024 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या नमन तिवारीनं निवड चाचण्यांदरम्यान सर्वांनाच प्रभावित करून सोडलं. हा 20 वर्षीय गोलंदाज नियमितपणे ताशी 140 किलोमीटर किंवा त्याहून अधिक वेगानं गोलंदाजी करतो. 2024 च्या ‘यूपी टी-20 लीग’मध्ये ‘नोएडा किंग्स’ संघाकडून खेळताना त्यानं चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं गरज पडल्यास तो एक उपयुक्त पर्यायी गोलंदाज ठरू शकतो. उजव्या हाताच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना चेंडू सरळ रेषेत टाकण्याची क्षमता नमनमध्ये लपलीय...

? आकिब नबी (दिल्ली कॅपिटल्स) : 29 वर्षांचा नबी काही तऊण नाही आणि तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरीव प्रमाणात म्हणजे आठ वर्षं खेळलाय. परंतु त्याच्या ‘आयपीएल’ पदार्पणाबद्दल दिल्लीच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलीय...संपलेल्या रणजी हंगामात त्यानं 60 बळी घेऊन जम्मू काश्मीरला एकहाती चषक मिळवून दिलाय असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये...‘बारामुल्ला एक्सप्रेस’चा मोठ्या सामन्यांमधील संयम आणि भारतातर्फे खेळण्याच्या त्याच्या आशा यांची यावर्षी कसोटी लागेल...तो सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत जम्मू काश्मीरसाठी 34 टी-20 सामने खेळलाय आणि प्रामुख्यानं ‘पॉवरप्ले’मधील गोलंदाजीचा विचार करता त्याचा 7.74 चा इकोनॉमी रेट चांगलाच म्हणायला हवा. आकिबच्या बाबतीत एकमेव चिंतेची बाब म्हणजे कमी वेग. तो ताशी 130 किलोमीटरांच्या आसपास गतीनं मारा करतो आणि आंतरराष्ट्रीय फलंदाज त्याचा सहज समाचार घेऊ शकतात...

Advertisement
Tags :

.