संभाव्य हॉकी संघामध्ये नवोदितांना संधी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेसाठी गुरुवारी हॉकी इंडियाने संभाव्य हॉकीपटूंची यादी जाहीर केली असून त्यामध्ये किमान 6 नवोदितांना संधी देण्यात आली आहे. हॉकी इंडियाने 32 संभाव्य हॉकीपटूंची यादी जाहीर केली असून यामध्ये यष्टीरक्षक प्रिन्सदीप सिंग, यशदीप सिवाच, रवीचंद्र सिंग, राजिंदर सिंग, अंगड वीरसिंग, उत्तम सिंग, अर्शदीप सिंग, हरमनप्रित सिंग, हार्दीक सिंग या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. तर या संभाव्य संघामध्ये कनिष्ट संघातील अंगड वीरसिंग आणि 20 वर्षीय अर्शदीप सिंगला वरिष्ठ संघामध्ये पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. कृष्णन बहाद्दुर फाटक, सुरज करकेरा यांना गोलरक्षकासाठी पहिली पसंती राहिल. यशदीप सिंग, जर्मनप्रित सिंग, अमित रोहीदास हे मधल्या फळीत राहितील. रवीचंद्र सिंग, मनप्रित सिंग, हार्दीक सिंग, विवेक सागर प्रसाद आणि नीलकांत शर्मा हे आघाडी फळीत राहतील. भुवनेश्वरमध्ये प्रो लीग स्पर्धा 15 ते 25 फेब्रुवारीदरम्यान खेळविली जाणार असून या स्पर्धेत स्पेन, जर्मनी, आयर्लंड, इंग्लंड यांचा समावेश आहे.