सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेमुळे वाचले नवजात बालकाचे प्राण
सावंतवाडी : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याची सध्याची आरोग्ययंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे आरोप होत असताना दुसरीकडे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने एक दिवसाच्या जन्मलेल्या नवजात बाळाला जीवदान दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे . मंगळवारी सकाळी तालुक्यातील बरागडे दांम्पत्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पुत्ररत्न प्राप्त झाले . सिजर झाल्यामुळे बाळाच्या आईचे आरोग्य काहीसे खालावले होते. तसेच जन्मलेल्या बाळाला श्वास घेताना अडथळा निर्माण होऊ लागल्याने बाळाला तत्काळ व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. परंतु , सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध नसल्याने बाळाला तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आले होते .परंतु , सायंकाळपर्यंत बाळाची तब्येत खालावत गेल्याने सदर खाजगी हॉस्पिटलने बाळाला तत्काळ गोवा बांबुळी येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. बाळाच्या नातेवाईकांनी शासनाच्या 108 रुग्णवाहिकेशी संपर्क केला खरा परंतु ,सर्व 108 रुग्णवाहिका व्यस्त होत्या. अशा अवस्थेत अस्वस्थ झालेल्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 108 चे मॅनेजिंग डिरेक्टर विनायक पाटील यांना फोन करून तत्काळ 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली असता त्यांनी ताबडतोब 108 रुग्णवाहिकेची ची व्यवस्था करून दिली. परंतु , दुर्दैवी म्हणजे गोवा बांबुळी येथे बाळासाठी बेड उपलब्ध नसल्याचे समजले . अशावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी डॉ. ऐवळे डॉ. सावंत व डॉ.खानोलकर यांची मदत घेऊन खाजगी हॉस्पिटल मधील सिस्टर स्वप्नाली दळवी यांना सोबत घेऊन सदर बाळाला पडवे येथील राणे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आल्यानंतर तेथे व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिला असता बाळाला जीवदान मिळाले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांच्या तत्पर कार्यामुळे बाळाचे प्राण वाचल्याने नातेवाईकांनी रवी जाधव व लक्ष्मण कदम यांचे आभार मानले असून आरोग्य यंत्रणेवर मात्र नाराजी व्यक्त केली आहे .