For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-20 मालिकेत न्यूझीलंडची विजयी सलामी

06:30 AM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
टी 20 मालिकेत न्यूझीलंडची विजयी सलामी
Advertisement

झिम्बाब्वेचा 92 धावांनी पराभव, सामनावीर अॅमेलिया केरचे नाबाद शतक, 2 बळी

Advertisement

वृत्तसंस्था / हॅमिल्टन

‘सामनावीर’ आणि नाबाद शतकवीर अॅमेलिया केरच्या शानदार कामगिरीच्या जोरावर येथे खेळविण्यात आलेल्या महिलांच्या टी-20 मालिकेतील सामन्यात यजमान न्यूझीलंडने झिम्बाब्वेवर 92 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाने शानदार अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन घडविले. कर्णधारपदाची सूत्रे हाती आल्यानंतर पहिल्याच सामन्यात केरने नाबाद शतक झळकविले.

Advertisement

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकांत 1 बाद 202 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेने 20 षटकांत 4 बाद 110 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 92 धावांनी गमवावा लागला.

न्यूझीलंडच्या डावामध्ये जॉर्जिया प्लीमेर आणि इसाबेला गॅझेने सलामीच्या गड्यासाठी 32 चेंडूत 43 धावांची भागिदारी केली. प्लीमेरने 20 चेंडूत 6 चौकारांसह 32 धावा झळकविल्या. त्यानंतर इसाबेला गॅझेने कर्णधार अॅमेलिया केरला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 88 चेंडूत अभेद्य 159 धावांची भागिदारी केली. गॅझेने 42 चेंडूत 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले तर अॅमेलिया केरने 29 चेंडूत 10 चौकारांसह अर्धशतक झळकविले. या जोडीने दीडशतकी भागिदारी 83 चेंडूत पूर्ण केली. अॅमेलिया केरने 51 चेंडूत 19 चौकारांसह शतक झळकविले. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकांत 46 धावा जमविताना 1 गडी गमविला. न्यूझीलंडच्या डावात 31 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे वेंझुराने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीची निडलोव्हा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचीत झाली. त्यानंतर दुसऱ्या सत्रातील पहिल्या चेंडूवर सलामीची वेंझुरा जेस केरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. टेरीपॅनोने 19 चेंडूत 4 चौकारांसह 19 धावा जमविल्या. कर्णधार निकोमो आणि बिझा यांनी चौथ्या गड्यासाठी 50 धावांची भागिदारी केली. बिझाने 55 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 49 तर निकोमोने 34 चेंडूत 1 चौकारांसह 25 धावा केल्या. 20 षटकांत झिम्बाब्वेने 4 बाद 110 धावांपर्यंत मजल मारली. झिम्बाब्वेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 38 धावा जमविताना 2 गडी गमविले. त्यांच्या डावात 11 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे अॅमेलिया केरने 14 धावांत 2 तर इलिंग आणि जेस केर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 1 बाद 202 (प्लिमेर 32, इसाबेला गॅझे नाबाद 66, अॅमेलिया केर नाबाद 101, अवांतर 3, वेंझुरा 1-37), झिम्बाब्वे 20 षटकांत 4 बाद 110 (बिझा नाबाद 49, एन्कोमो 25, टेरीपॅनो 19, अवांतर 9, अॅमेलिया केर 2-14, इलिंग व जेस केर प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.