संसदेतील हाका नृत्यामुळे न्यूझीलंडची अब्रू वेशीवर
बावीस वर्षीय कुमारी हाना राविती या आदिवासी समाजातील युवा खासदाराने न्यूझीलंडच्या संसदेत केलेल्या हाका आदिवासी नृत्याने जगाचे लक्ष वेधले. माऊरी हा आदिवासी समाज न्यूझीलंडचा मूळ निवासी असून ब्रिटिश राजसत्तेने या आदिवासी समाजाचा प्रचंड नरसंहार केला. आजही या समाजाला हीन दर्जाची वागणूक राजसत्ता आणि पोलिस यंत्रणेकडून दिली जाते. एकेकाळी न्यूझीलंडवर अधिसत्ता गाजविणाऱ्या माऊरी आदिवासी समाजापाशी आज केवळ पाच टक्के भूभाग शिल्लक असून त्यावर डोळा ठेऊन न्यूझीलंड सरकारने आणलेल्या जमीन सुधारणा विधेयकाला होणाऱ्या जबर विरोधाला संसदेतील हाका नृत्याने जगप्रसिद्धी मिळवून दिली.
बहुमताच्या आधारावर केवळ 20 टक्के आदिवासी माऊरी समाजाला असलेल्या विशेष अधिकारांवर गदा आणणारे विधेयक न्यूझीलंडच्या संसदेत सादर झालेले आहे. युरोपियन वंशाच्या अधिकतर खासदारांनी या विधेयकाचे समर्थन केले होते. या संसदेत माऊरी समाजाचे प्रतिनिधीत्व केवळ सात खासदार करत असून त्यात कुमारी हाना राविती या बावीस वर्षीय युवतीचाही समावेश आहे. गेल्या आठवडयात देशात कथित समानता आणणारे विधेयकावर चर्चा सुरु होती. या विधेयकाला सत्ताधारी पक्षातील उजव्या विचारसरणीच्या खासदारांनी आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला. सभागृहातील ज्येष्ठ सभासदांनी आपले म्हणणे मांडून झाल्यानंतर माऊरी समाजाच्या खासदारांनी सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या विधेयकाला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यात कुमारी हाना राविती यांना सभापतींनी बोलण्याची संधी दिली.
कुमारी हाना राविती यांना विधेयकावर बोलण्याची संधी मिळताच त्यांनी माऊरी समाजाचे पारंपारिक नृत्य हाका करण्यास सुरुवात केली. तिला सभागृहातील विरोधी पक्षांच्या माऊरी व अन्य सभासदांनी साथ दिली. केवळ तीन मिनीटांचा हा न्यूझीलंडच्या संसदेतील हाका डान्स जगभरात प्रचंड गाजला. युरोपियन नागरिकांनी न्यूझीलंडमधील आदिवासी समाजाला कशाप्रकारे लुबाडले व अत्याचार केले याची माहिती संपूर्ण जगाला कळून आली. सध्या न्यूझीलंडमध्ये विद्यमान सरकारने 1840 साली वेटांगी कराराद्वारे आदिवासी समाजाला दिलेले अधिकार समानतेच्या नावाखाली काढून घेण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. या विधेयकाला माऊरी समाजाने जबरदस्त विरोध केलेला असून जवळपास 450 किलोमीटरचे अंतर पार करून 60 हजार आदिवासी राजधानीत पोहोचले.
वेटांगी करारामुळे माऊरी समाजापाशी उत्तर न्यूझीलंडमध्ये जमिनीचे भूखंड शाबूत राहिलेले आहेत. वेटांगी करारात त्यांच्यापाशी असलेल्या भूखंडात शहरीकरणाला कारणीभूत ठरणारे मोठ मोठे प्रकल्प उभारता येत नाहीत. तर न्यूझीलंडमध्ये आदिवासी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या भागापाशी आता बऱ्यापैकी विकास झालेला आहे. मात्र वेटांगी करारामुळे माऊरी समाजापाशी असलेल्या जमिनीचा वापर करता येत नसल्याने वैतागलेल्या युरोपियन वंशियांनी संसदेतील बहुमताच्या आधारे 1940 साली झालेल्या वेटांगी करारातील तरतूदी रद्दबातल ठरविण्यासाठी एक विद्येयक संसदेच्या पटलावर चर्चेसाठी प्रलंबित आहे.
संसदेतील जमीन सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्या खासदार कुमारी हाना राविती हिने संसदेत केलेल्या आदिवासी समाजाच्या हाका नृत्यामुळे न्यूझीलंड सरकारची जगभरात नाचक्की होत आहे. त्यांचे हे हाका नृत्य वेगाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि माऊरी आदिवासींची व्यथा जगासमोर आली. वेटांगी करार 1840 साली ब्रिटिश गव्हर्नर आणि माऊरी समाजाचे प्रमुख यांच्या स्वाक्षरीने पूर्णत्वाला आला. 1660 साली स्पेनच्या डच नाविकांनी न्यूझीलंडचा बेट समुहाचा भाग शोधून काढला. हळूहळू या बेट समुहांवर युरोपियन नागरिकांनी कब्जा करण्यास सुरुवात केली. पुढे ब्रिटिशांनी या बेटावर वास्तव्यास असलेल्या माऊरी या आदिवासी समाजाची कत्तल करण्यास सुरुवात केली. युरोपियन लोकांपाशी अत्याधुनिक पद्धतीची शस्त्रे असल्याने माऊरी समाजाच्या लढवय्यांना अनेकवेळा हार पत्करावी लागली. ज्यावेळी माऊरी समाजाला हार पत्करावी लागली, त्या प्रत्येकवेळी या आदिवासी समाजाचा मोठ्या प्रमाणात नरसंहार होत होता. युरोपियन वसाहतवाद्यांचे अत्याचार वाढत असल्याने विस्कटलेल्या माऊरी समाजाला नेतृत्व मिळाले. 1840 साली वेटांगी करार झाल्यानंतर त्याला बगल देण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला. त्यानंतर पुन्हा संघर्ष सुरु झाला. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी सलग 12 वर्षे ब्रिटिश सरकार आणि माऊरी यांच्यात संघर्ष सुरु होता.
1975 साली वेटांगी आयोगाची स्थापना झाली. माऊरी समाजाच्या तक्रारींचे निराकरण व्हावे हा आयोगाच्या स्थापनेमागे मुख्य उद्देश होता. विसाव्या शतकातही न्यूझीलंडच्या मूळ निवासींना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता. एकविसाव्या शतकात त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. त्याचप्रमाणे त्यांना 120 सदस्यांच्या संसदेत 4 मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले होते. आता राखीव मतदार संघांची संख्या 7 एवढी झालेली आहे. माऊरी समाजातील 80 टक्के लोकसंख्या आता शहरात वास्तव्य करीत असून त्यांची आताची पिढी उच्च शिक्षण घेत आहे. एकेकाळी संपूर्ण न्यूझीलंडच्या भूभागाचे मालक असलेला माऊरी समाजापाशी आज केवळ पाच टक्के जमिनीची मालकी आहे. आपल्या याच अधिकारासाठी आजही या आदिवासी समाजाला तथाकथित मानवतावादी युरोपियन लोकांच्या अत्याचाराविरोधात लढा देण्यासाठी न्यूझीलंडच्या संसदेत हाका नृत्याचा आधार घेऊन जगाचे लक्ष वेधावे लागते.
- प्रशांत कामत