For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंडचा इंग्लंडवर ऐतिहासिक कसोटी मालिका विजय

06:36 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंडचा इंग्लंडवर ऐतिहासिक कसोटी मालिका विजय
Advertisement

वृत्तसंस्था, नॉटिंगहॅम

Advertisement

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत येथे झालेली तीन सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडने हस्तगत केली. या मालिकेत न्यूझीलंडने यजमान इंग्लंडचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा सोमवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी 160 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंड संघातील नाबाद शतक झळकविणारा आणि 5 झेल टिपणारा डॅरील मिचेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले तर इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला मालिकावीर म्हणून जाहीर करण्यात आले.

या शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 438 धावा जमविल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 354 धावा केल्या. न्यूझीलंडने इंग्लंडवर पहिल्या डावात 84 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 94 षटकांत 9 बाद 288 धावांवर डाव घोषित करून इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 373 धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात डॅरील मिचेलने 241 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 100 तर रचिन रवींद्रने 149 चेंडूत 12 चौकारांसह 94 धावा झळकविल्या. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 129 धावांची शतकी भागिदारी केली. इंग्लंडतर्फे आर्चरने 53 धावांत 4 तर स्टोक्स आणि अॅटकिन्सन यांनी प्रत्येकी 2 गडी तसेच शोएब बशिरने 1 गडी बाद केला.

Advertisement

इंग्लंडने 4 बाद 103 या धावसंख्येवरुन पाचव्या आणि शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 51.2 षटकांत 212 धावांत आटोपला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेमी स्मिथने 1 षटकार आणि 8 चौकारांसह 60 धावा तर डकेटने 6 चौकारांसह 36, कर्णधार स्टोक्सने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 30, ब्रुकने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21, अॅटकिन्सनने 2 चौकारांसह 19 धावा आणि डकेटने 42 चेंडूत 6 चौकारांसह 36 धावा झळकविल्या. न्यूझीलंडतर्फे फॉक्सने 52 धावांत 3 तर नाथन स्मिथ आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 2 तसेच सियर्सने 1 गडी बाद केला. उपाहारानंतर काही मिनिटांतच इंग्लंडचा दुसरा डाव संपुष्टात आला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा शेवटचा सामना होता. या सामन्यावेळी स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नाट्यामयरित्या निवृत्तीची घोषणा केली.

स्टोक्सची निवृत्ती

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने रविवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीतील खेळाच्या चौथ्या दिवशी नाट्यामयरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा करुन चाहत्यांना अनपेक्षित धक्का दिला. स्टोक्सने गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना सातत्याने दर्जेदार कामगिरी केली आहे. 2019 साली लॉर्ड्स मैदानावर झालेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करुन पहिल्यांदा अजिंक्यपद मिळविले होते. या सामन्यात स्टोक्सची खेळी निर्णायक ठरली होती. तसेच 2022 साली इंग्लंडने आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती आणि इंग्लंड संघातर्फे स्टोक्सची खेळी महत्त्वाची ठरली होती. 2022 साली स्टोक्सची इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. इंग्ल-वेल्स क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्टोक्सच्या क्रिकेटमधील योगदानाचे कौतुक केले आहे.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प. डाव सर्वबाद 438, इंग्लंड प. डाव सर्वबाद 354, न्यूझीलंड दु. डाव 9 बाद 288 डाव घोषित (डॅरील मिचेल नाबाद 100, रचिन रवींद्र 94, आर्चर 4-53, अॅटकिन्सन व स्टोक्स प्रत्येकी 2 बळी, शोएब बशिर 1-42), इंग्लंड दु. डाव 51.2 षटकांत सर्वबाद 212 (स्मिथ 60, डकेट 36, स्टोक्स 30, ब्रुक 21, अॅटकिन्सन 19, रूट 18, डकेट 36, फॉक्स 3-52, सँटनर व स्मिथ प्रत्येकी 2 बळी, सियर्स 1-12).

Advertisement
Tags :

.