For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यूझीलंडचा मालिकेतील पहिला विजय

06:55 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंडचा मालिकेतील पहिला विजय
Advertisement

भारताचा 50 धावांनी पराभव, सामनावीर सीफर्टचे अर्धशतक, सँटनरचे 3 बळी, दुबेचे प्रयत्न अपुरे

Advertisement

वृत्तसंस्था / विशाखापट्टणम

सामनावीर टिम सीफर्टचे दमदार अर्धशतक तसेच सँटनरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर येथे बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडने यजमान भारताचा 50 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत आपला पहिला विजय नोंदविला. भारताने या मालिकेतील पहिले सलग तीन सामने जिंकून विजयी आघाडी मिळविली आहे.

Advertisement

बुधवारच्या चौथ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकांत 7 बाद 215 धावा जमविल्या. त्यानंतर भारताचा डाव 18.4 षटकांत 165 धावांत आटोपला.

न्यूझीलंडच्या डावामध्ये टिम सीफर्टने दमदार फलंदाजी करत 36 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह जलद 62 धावा झोडपताना कॉनवेसमवेत सलामीच्या गड्यासाठी 50 चेंडूत शतकी भागिदारी केली. कॉनवेने 23 चेंडूत 3 षटकार आणि 4 षटकारासह 44 धावा झळकविल्या. सीफर्टने यापूर्वी बिग बॅश लीग स्पर्धेत खेळल्यानंतर त्याचे न्यूझीलंड संघात आगमन झाले. सीफर्टने अर्शदीप सिंगच्या एका षटकात सलग तीन चौकार मारले. त्यानंतर हर्षित राणाला लाँगऑनच्या दिशेने 1 षटकार खेचला. बुमराहच्या गोलंदाजीवर त्याने पाठोपाठच्या चेंडूवर 1 षटकार आणि 1 चौकार मारला. न्यूझीलंडने चौथ्याच षटकात अर्धशतक नोंदविले तर पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत बिनबाद 71 धावा जमविल्या होत्या. सीफर्टने आपले अर्धशतक 25 चेंडूत पूर्ण केले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी 37 धावांत न्यूझीलंडचे 4 गडी बाद केले. 13.4 षटकात न्यूझीलंडने 4 बाद 137 धावा जमविल्या होत्या. रचिन रवींद्र केवळ 2 धावांवर बाद झाला. फिलीप्सने 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24 धावा केल्या. डॅरील मिचेलने 18 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 39, कर्णधार सँटनरने 1 षटकार आणि 1 चौकारासह 11, फॉक्सने 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावा केल्या. न्यूझीलंडच्या डावात 12 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 तर बुमराह आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर सलामीचा अभिषेक शर्मा हेन्रीच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. त्यानंतर डफीने स्वत:च्याच गोलंदाजीवर कर्णधार सूर्यकुमारला बाद केले. त्याने 8 धावा केल्या. संजू सॅमसनने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. सँटनरने त्याचा त्रिफळा उडविला. फॉक्सने हार्दीक पंड्याला 2 धावांवर त्रिफळाचीत केले. रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी अनुक्रमे 39 आणि 65 धावांचे योगदान दिल्यामुळे भारताला 165 धावांपर्यंत मजल मारता आली. रिंकू सिंगने 30 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 39 तर शिवम दुबेने 23 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांसह 65 धावा झळकविल्या. बिश्नोईने नाबाद 10 धावा केल्या. अर्शदीप सिंगला खाते उघडता आले नाही. बुमराह, कुलदीप यादव व हर्षित राणा यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताच्या डावामध्ये 14 चौकार आणि 10 षटकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे सँटनरने 26 धावांत 3 तर डफी आणि सोधी यांनी प्रत्येकी 2 तसेच हेन्री व फॉक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी 31 जानेवारी रोजी थिरुवनंतपूरम येथे होणार आहे. भारताने मालिकेत 3-1 अशी आघाडी मिळविली आहे.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 7 बाद 215 (सीफर्ट 62, कॉनवे 44, मिचेल नाबाद 39, फिलिप्स 24, सँटनर 11, फॉक्स 13, अर्शदीप सिंग व कुलदीप यादव प्रत्येकी 2 बळी, बुमराह व बिश्नोई प्रत्येकी 1 बळी), भारत 18.4 षटकांत सर्वबाद 165 (शिवम दुबे 23 चेंडूत 65, रिंकू सिंग 39, संजू सॅमसन 24, बिश्नोई 10, सँटनर 3-26, डफी व सोधी प्रत्येकी 2 बळी, हेन्री व फॉक्स प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.