दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडची दादागिरी
किवीजच्या फिरकीसमोर भारताची शरणागती, दिवसभरात 14 बळी, सँटनरचे 7 बळी, न्यूझीलंडला 301 धावांची आघाडी
वृत्तसंस्था / पुणे
न्यूझीलंड संघाने येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी आपली स्थिती अधिक मजबूत करताना 301 धावांची भक्कम आघाडीवर भारतावर मिळविली. न्यूझीलंडच्या सँटनरच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. 14 गडी बाद करत गोलंदाजांनी दिवस गाजविला. न्यूझीलंडच्या सँटेनरने 53 धावांत 7 गडी बाद केले.
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बेंगळूरची पहिली कसोटी न्यूझीलंडने आपल्या प्रभावी फिरकी गोलंदाजीवर जिंकल्यानंतर पुण्यातील दुसऱ्या कसोटीत फिरकीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज पुन्हा प्रभावी ठरले. बेंगळूरप्रमाणेच पुण्याच्या दुसऱ्या कसोटीतही भारताचा पहिला डाव न्यूझीलंडच्या फिरकीसमोर कोलमडला. 1 बाद 16 या धावसंख्येवरुन भारताने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित 9 गडी 140 धावांत चहापानापूर्वीच तंबूत परतले. मिचेल सँटनरच्या फिरकीसमोर भारताच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा गाठता आला नाही. सलामीच्या जैस्वालने 60 चेंडूत 4 चौकारांसह 30, शुभमन गिलने 72 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 30, ऋषभ पंतने 19 चेंडूत 2 चौकारांसह 18, सर्फराज खानने 1 चौकारासह 11 तर रवींद्र जडेजाने 46 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 38 धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 18 धावा जमविल्या. न्यूझीलंडचा संघ आता भारतामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक कसोटी मालिका विजय 1955-56 नंतर मिळविण्याच्या उंबरठ्यावर आहे. बेंगळूरच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी निचांकी 46 धावसंख्या रचली होती. 36 वर्षांनंतर भारतीय संघाला न्यूझीलंडकडून कसोटी सामन्यात पहिला पराभव स्वीकारावा लागला होता. 2012-13 नंतर भारतीय संघाने मायदेशात अद्याप एकही कसोटी मालिका गमविलेली नाही. 2012-13 साली इंग्लंडकडून भारताला कसोटी मालिकेत हार पत्करावी लागली होती. त्यानंतर सलग 18 मालिकांमध्ये भारताने आपली अपराजित वाटचाल कायम राखली होती. भारतीय संघाने 2008 च्या डिसेंबरमध्ये चेन्नईत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 387 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळविला होता.
शुक्रवारी खेळाला प्रारंभ झाल्यानंतर भारताच्या तुलनेत न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी अधिक सरस कामगिरी करत भारताला पहिल्या डावात 45.3 षटकात 156 धावांवर रोखले. उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात भारताने 91 धावांत 6 गडी गमविले. पण न्यूझीलंडचा कर्णधार लॅथमने दुसऱ्या डावामध्ये भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर आक्रमक फटकेबाजी करण्याचे धाडस केल्याने किवीजचे डावपेच यशस्वी ठरले. भारतीय संघाच्या पहिल्या डावातील 24 व्या षटकात अनुभवी विराट कोहलीने सँटनरच्या फुलटॉस चेंडूवर आडवा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा त्रिफळा उडाला. कोहलीने केवळ 1 धाव घेतली. कोहलीसारख्या अनुभवी फलंदाजाकडून अशा चुकीच्या फटक्याने शौकिनांना धक्का बसला. दरम्यान, जैस्वालने बऱ्यापैकी फलंदाजी करत 30 धावांचे योगदान दिले. पण फिलीप्सच्या गोलंदाजीवर तो मिचेलकरवी झेलबाद झाला. फिलीप्सचा हा पहिला बळी ठरला. यष्टीरक्षक पंत फिलीप्सच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचित झाला. फिलीप्सच्या वळलेल्या चेंडूचा अंदाज पंतला आला नाही. पंत बाद झाला त्यावेळी भारताची स्थिती 5 बाद 83 अशी होती. बेंगळूरच्या पहिल्या कसोटीत दीडशतकी खेळी करणारा सर्फराज खान सँटनरच्या गोलंदाजीवर ओरुरकेकडे सोपा झेल देवून तंबूत परतला. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या चिवट फलंदाजीमुळे भारताला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. न्यूझीलंडतर्फे सँटनरने 53 धावांत 7 तर फिलीप्सने 26 धावांत 2 आणि साऊदीने 18 धावांत 1 गडी बाद केला. न्यूझीलंडने भारतावर पहिल्या डावात 103 धावांची आघाडी मिळविली.
न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात करताना आक्रमक फटकेबाजीवर अधिक भर दिला. कर्णधार लॅथम आणि कॉनवे या सलामीच्या जोडीने 36 धावांची भागिदारी केली. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर कॉनवे पायचित झाला. त्याने 25 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला यंग आश्विनच्या गोलंदाजीवर पंतकडे झेल देवून तंबुत परतला. त्याने 28 चेंडूत 2 चौकारांसह 23 धावा जमविताना लॅथमसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 42 धावांची भागिदारी केली. रचिन रवींद्र वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचित झाला. त्याने 1 चौकारासह 9 धावा जमविल्या. चहापानावेळी न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 2 बाद 85 धावांपर्यंत मजल मारली होती.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये न्यूझीलंडने आक्रमक फटकेबाजी करत 113 धावांची भर घालताना 3 गडी गमविले. लॅथम आणि मिचेल यांनी चौथ्या गड्यासाठी 34 धावांची भागिदारी केली. मात्र ब्लंडेलकडून लॅथमला चांगली साथ मिळाली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर लॅथम पायचीत झाला. त्याने 133 चेंडूत 10 चौकारांसह 86 धावा काढल्या. वॉशिंग्टन सुंदरचा हा चौथा बळी ठरला. दिवसअखेर ब्लंडेल 2 चौकारांसह 30, फिलीप्स 9 धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडने दिवसअखेर दुसऱ्या डावात 53 षटकात 5 बाद 198 धावा जमविल्याने न्यूझीलंडने भारतावर 301 धावांची मजबूत बढत मिळविली आहे. ही कसोटी पुन्हा तीन दिवसांत संपेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने 56 धावांत 4 तर अश्विनने 64 धावांत 1 गडी बाद केला. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत 11 बळी घेतले आहेत.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प. डाव 79.1 षटकात सर्वबाद 259, भारत प. डाव 45.3 षटकात सर्व बाद 156 (जैस्वाल 30, गील 30, पंत 18, सर्फराज खान 11, जडेजा 38, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 18, सँटेनर 7-53, फिलीप्स 2-26, साऊदी 1-18), न्यूझीलंड दु. डाव 53 षटकात 5 बाद 198 (लॅथम 86, कॉनवे 17, यंग 23, रचिन रवींद्र 9, मिचेल 18, ब्लंडेल खेळत आहे 30, फिलीप्स खेळत आहे 9, अवांतर 6, वॉशिंग्टन सुंदर 4-56, अश्विन 1-64)