न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा झाला ‘करेक्ट’ कार्यक्रम
बघता बघता भारतीय संघाने किवीच्या दौऱ्यातील पहिली मोहीम फत्ते केली. ही मोहीम फत्ते केल्यानंतर मला हिंदी समालोचनातील पितामह सुशील दोशी यांची आठवण झाली. त्यांच्या प्रत्येक सामन्यात एक परवलीचे वाक्य नेहमी असायचे ते म्हणजे ‘आप सब कुछ करो, लेकिन क्रिकेट मे भविष्यवाणी मत करो’. ही मालिका सुरू होण्याच्या अगोदर क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडच्या मायभूमीत मालिका जिंकणं ही फार दूरची गोष्ट होती. एक सामना जिंकला तरी डोक्यावरून पाणी होतं. परंतु भारतीय संघाने तर कमालच केली. सलग तीन सामने जिंकत मालिका अगदी लिलया खिशात टाकली. भारतीय संघ तिन्ही सामन्यात भारतीय खेळपट्टीवरच खेळतोय अशाच आविर्भावात खेळला.
पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाचे मधल्या फळीतील किंबहुना सहाव्या, सातव्या, आठव्या क्रमांकाचे खेळाडू रॉबिनहूड ठरले. परंतु निर्णायक तिसऱ्या सामन्यात मात्र सलामीवीर दबंग ठरले. मालिका विजयाचे थलपती हे भारतीय फलंदाज होते. फरक एवढाच होता की पहिल्या दोन सामन्यात मधली फळी बहरली. तर तिसऱ्या सामन्यात सलामीवीरांचे दिवाळी अगोदरचे फटाके अनुभवाला मिळाले. यशाचं गुपित जाणून घ्यायचं असेल तर रतन टाटा, स्टीव्ह जॉब्स, सुंदर पिचाई यांना जाणून घेणं जसं गरजेचं असतं, तसंच क्रिकेटमध्ये विशेषत: या छोट्या फॉरमॅटमध्ये आक्रमकतेचे जर धडे गिरवायचे असतील तर तुम्हाला वैभव आणि अभिषेकची फलंदाजी ही अनुभवावीच लागेल. तिसऱ्या सामन्यातील आक्रमकता बघून न्यूझीलंडचा आक्रमकतेचा संस्थापक ब्रॅण्डन मेकॉलम खऱ्या अर्थाने खजील झाला असावा. सामने न्यूझीलंडमध्ये नव्हते तर दुबईत होते, असा भास व्हावा अशी फलंदाजी भारतीयांनी केली. पहिल्या पाच षटकात भारतीय संघाचे शतक फलकावर बघायला मिळालं. हे मालिका सुरू होण्याअगोदर बरेच फुफा नाराज होते. (इथे क्रिकेट विश्लेषक अभिप्रेत आहेत). भारतीय टी-20 संघाचे काय होईल? भारतीय क्रिकेट संघाला व्हाईटवॉश तर नाही ना मिळणार, असे विविध प्रश्न नाराज फुफांच्या चेहऱ्यावर होते. परंतु तीन सामन्यातील भारताची कामगिरी बघून त्यांच्या चेहऱ्यावरील छटा बदलल्या नसतील तरच नवल. तिसऱ्या सामन्यात खऱ्या अर्थाने वाऱ्याचा फार मोठा अडथळा होता. परंतु हे खारेवारे, मतलई वारे हे फक्त भूगोलापुरतेच मर्यादित राहिले. पूर्ण तीन सामन्यात किवींचे गोलंदाज क्लब धार्जिणे वाटले. तिसऱ्या सामन्यात तर न्यूझीलंडचं डिपॉझिट जप्त झालं. कालचा मालिका विजय पाहून असेच मनापासून म्हणावसं वाटतं ते म्हणजे काय ते चौकार, काय ते षटकार, काय ते नेत्रदीपक शतक! सगळं कसं अगदी ओके मध्ये.
जखमेवर मीठ चोळल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदना काही वर्षांपूर्वी किवी संघाने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अनुभवले होते. नेमक्या तशाच काहीशा वेदना या पहिल्या तीन सामन्यात विशेषत: तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने अनुभवल्या. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये भारतीय फलंदाजांची दादागिरी परदेशात फार कमी अनुभवायला मिळाली आहे. परंतु या मालिकेतील पहिल्या तीन सामन्याने कडी केली. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मायभूमीत भारतीय संघ न्यूझीलंडसमोर शरणार्थी झाला होता. परंतु या तीन सामन्यात मिचेल सँटनरला मालिका गमावत ‘जड झाले ओझे’ असे म्हणण्याची वेळ आली एवढे मात्र खरं! मालिकेतील हा विजयोत्सव असाच चालू राहत 5-0 चा विजय मिळवो, हीच इच्छा. पुन्हा एकदा भारतीय संघाचं त्रिवार अभिनंदन! थोडक्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा अगदी ‘करेक्ट’ कार्यक्रम केला, एवढं मात्र खरं!
