न्यूझीलंड महिला संघाचा मालिका विजय
मॅडी ग्रीन मालिकावीर, जॉर्जिया प्लिमेर सामनावीर
वृत्तसंस्था/ नेलसन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंड महिला संघाने लंकन महिला क्रिकेट संघाचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने लंकेचा 98 धावांनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. प्लिमेरच्या दमदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 50 षटकात 6 बाद 280 धावा झळकाविल्या. त्यानंतर लंकन महिला संघाचा डाव 182 धावांत आटोपला.
न्यूझीलंडच्या डावामध्ये कर्णधार बेट्स आणि प्लिमेर यांनी सलामीच्या गड्यासाठी 108 धावांची शतकी भागिदारी केली. बेट्सने 69 चेंडूत 7 चौकारांसह 53 धावा जमविल्या. मॅकलॉडने 4 धावा केल्या. हॅलिडेने 43 चेंडूत 2 चौकारांसह 36 धावा जमविताना प्लिमेरसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. प्लिमेरने 120 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 112 धावा झळकाविल्या. तिने आपले शतक 113 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. मॅडी ग्रीनने 24 चेंडूत 2 चौकारांसह 32, गेझने 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 24 धावा जमविल्या. जेस केर 6 धावांवर बाद झाली. न्यूझीलंडच्या डावात 3 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे सुगंधीका कुमारीने 3 तर कुलसूर्या, अटापट्टू आणि निशानसेला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे पहिले 3 फलंदाज केवळ 23 धावांत तंबूत परतले. कवीशा दिलहारी आणि निलाक्षिका सिल्वा यांनी पाचव्या गड्यासाठी 46 धावांची भर घातली. दिलहारीने 54 चेंडूत 1 षटकारासह 45 तर सिल्वाने 73 चेंडूत 2 चौकारांसह 45 धावा जमविल्या. संजीवनीने 1 चौकारासह 23 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. लंकेच्या डावामध्ये 1 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे जेस केर आणि जोनास यांनी प्रत्येकी 3 तर कार्सनने 2 तसेच हॅलिडे आणि ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 50 षटकात 6 बाद 280 (प्लिमेर 112, बेट्स 53, हॅलिडे 36, ग्रीन 32, गेझ नाबाद 24, सुगंधीका कुमारी 3-70, कुलसूर्या अटापट्टू आणि निशानसेला प्रत्येकी 1 बळी), लंका 50 षटकात सर्वबाद 182 (दिलहारी 45, सिल्वा 45, संजीवनी 23, दुलानी 11, अवांतर 24, जेस केर व जोनास प्रत्येकी 3 बळी, कार्सन 2 बळी, हॅलिडे व ग्रीन प्रत्येकी 1 बळी).